एकीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दुसरीसोबतच केला विवाह; नर्सने इजेक्शन घेऊन संपवलं जीवन
By राम शिनगारे | Published: May 3, 2023 07:46 PM2023-05-03T19:46:23+5:302023-05-03T19:46:36+5:30
बेगमपुरा पोलिस ठाण्यात ब्रदरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटीत) नर्स युवतीला ब्रदरने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाच्या अमिषाने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला सोडून देत दुसरीसोबतच विवाह केला. त्यामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या युवतीने राहत्या घरातील टाॅयलेटमध्ये विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. हा प्रकार १ मेच्या रात्री घडला. या प्रकरणी बेगमपुरा ठाण्यात ब्रदरच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
कल्पना विठ्ठलराव जाधव (३०, रा. नांदेड, ह.मु.मोहिणी अपार्टमेंट, जयसिंगपुरा) असे आत्महत्या केलेल्या नर्सचे, तर ज्ञानेश्वर किसन पवार (३६, रा. घाटी दवाखाना) असे आरोपी ब्रदरचे नाव आहे. बेगमपुरा पोलिस ठाण्यात मृत कल्पनाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार २०१६ पासून कल्पना घाटीमध्ये नर्स म्हणून कार्यरत होती. २६ एप्रिल रोजी ती गावी नांदेडला आली. तेथून ३० एप्रिलला कामावर रुजू झाली. १ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मृताची आई व भाऊ तिच्या जयसिंगपुरा येथील फ्लॅटवर आले. त्याठिकाणी तिघांनी गप्पा मारल्या. काही वेळाने कल्पना टॉयलेटला गेली. त्याचकालावधीत दोघांना झोप लागली.
दरम्यान, फिर्यादीची दुसरी मुलगी घरी आली. तेव्हा भावाने दरवाजा उघडला. त्यानंतर आई, भाऊ आणि बहिण बोलत असतानाच त्यांनी कल्पना आणखी टॉयलेटमधून बाहेर कशी आली नाही, अशी विचारणा केली. तिच्या मोबाईलवर फोन लावला असता, तो बाहेरच होता. त्यानंतर तिघांनी टाॅयलेटचा दरवाजा तोडला. तेव्हा कल्पनाने हाताला इंजेक्शन टोचल्याचे दिसून आले. तिला बेशुध्दावस्थेत घाटीत दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ज्ञानेश्वर पवारच्या विरोधात नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक साधना आढाव करीत आहेत.