दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक ठार, दुसरा गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:37 AM2018-05-28T00:37:39+5:302018-05-28T00:38:03+5:30

शेतात झोपलेल्या भावांना जबर मारहाण : फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड शिवारातील घटना

 One killed and another seriously injured in a dacoity attack | दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक ठार, दुसरा गंभीर जखमी

दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक ठार, दुसरा गंभीर जखमी

googlenewsNext

फुलंब्री : शेतात झोपलेल्या दोन भावांना दरोडेखोरांनी मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरगाव कवाड शिवारात रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली.
जखमीवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून, फुलंब्री पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
समाधान रंगनाथ पवार (१८, रा. डोंगरगाव कवाड) असे मयताचे नाव असून, जखमीचे नाव अजिनाथ रंगनाथ पवार (२३) असे आहे.
पोलिसांनी सांगितले की, रंगनाथ फकीरबा पवार हे मूळचे फुलंब्री तालुक्यातील वावना येथील रहिवासी असून, ते डोंगरगाव कवाड येथील जावई आहेत. २२ वर्षांपूर्वी ते डोंगरगाव कवाड येथे राहण्यास आले होते. त्यांनी गट नं. ३७८ मध्ये सात एकर शेती घेतली. त्यांना तीन मुले असून, मोठ्या मुलाचा चार वर्षांपूर्वी विहिरीत पडून मृत्यू झाला होता. मोठा मुलगा अजिनाथचे लग्न झाले असून, आई-वडिलांसह सर्व कुटुंब शेती करतात. तसेच गावात रसवंतीगृह असून, बाजारातही ते रसवंतीचा व्यवसाय करतात. शेतात व गावात स्लॅबचे घर असून, शेतात दोन बैल व तीन दुभत्या गायी आहेत. या जनावरांची देखभाल व्हावी म्हणून दोघे भाऊ रात्री शेतात झोपतात. बाकी कुटुंब गावातील घरात झोपते.
अजिनाथ व समाधान हे दोघे भाऊ शनिवारी रात्री शेतातील घराच्या गच्चीवर झोपले असताना रविवारी पहाटे दरोडेखोर चोरीच्या उद्देशाने तेथे आले. यावेळी दोन्ही भावांना जाग आली. दरोडेखोरांनी दोन्ही भावांना मारहाण करून दगडाने वार केला. यात दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. ही वार्ता कळताच गावकरी जमा झाले व त्यांनी दोघा भावांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना समाधान पवारचा मृत्यू झाला तर अजिनाथवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. उत्तरीय तपासणीनंतर रविवारी दुपारी समाधानवर डोंगरगाव कवाड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांना वेगळाच संशय
आज दिवसभर फुलंब्रीचे पोलीस या घटनेचा तपास करीत असताना त्यांना हा दरोडा नसून वेगळाच संशय येत आहे. श्वानपथकालाही दरोडेखोरांचा माग काढता आला नाही. शेतात स्लॅबचे घर असून ते वीस फूट उंच आहे. गच्चीवर जाण्यासाठी शिडी लावून जावे लागते. गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या दोन्ही भावांनी या शिडीचा वापर करुन ती गच्चीवर ओढून घेतली असेलच. परंतु घटनास्थळी शिडी तशीच लावलेली आढळली. त्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. झोपल्या ठिकाणी अंथरुणावर रक्त सांडलेले होते. येथे मोठा दगड आढळून आला. त्याला रक्त लागलेले होते. घरावर झटापट झाली असेल तर दरोडेखोरांनाही मार लागलाच असावा. अशा एक ना अनेक शंका आल्याने पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटत आहे. त्यामुळे पोलीस बारकाईने तपास करीत आहेत. तपासाअंती सत्य घटना समोर येईल, असे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी सांगितले. तूर्त पोलिसांनी दरोडा व खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली आहे.

Web Title:  One killed and another seriously injured in a dacoity attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस