शेतातील सामाईक बांधाच्या वादातून एकाची हत्या; पाचजणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 07:15 PM2019-06-25T19:15:52+5:302019-06-25T19:17:20+5:30
गेल्या काही दिवसांपासून सामाईक बांधावरून वाद सुरू होता
वैजापूर (औरंगाबाद ) : शेतातील बांधावर वळण टाकल्याच्या कारणावरून छातीत लाथाबुक्क्याने मारहाण करून एकाला ठार मारल्याची घटना तालुक्यातील डागपिंपळगाव येथे सोमवारी (दि. २४ ) सायंकाळी घडली. या प्रकरणी मृताच्या दोन साडूसह पाच जणाविरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून एकाला औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अशोक बाबूराव डांगे (५६) असे या घटनेतील मयत इसमाचे नांव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक डांगे यांची डागपिंपळगाव शिवारात गट नंबर १०२ मध्ये शेती आहे. त्यांचे दोन साडूही डागपिंपळगाव येथेच राहत असून डांगे व त्यांच्या शेताचा सामाईक बांध आहे. गेल्या काही दिवसापासून सामाईक बांधावरून त्यांचा वाद सुरू आहे. सोमवारी अशोक डांगे यांचा मुलगा अंकूश हा बांधावर माती टाकत होता. या कारणावरून अंकूश याचे लोहकणे व माकोडे हे दोन्ही काका व तीन मावस भाऊ डांगे यांच्या घरी आले. बांधावर माती का टाकली असे म्हणून त्यांनी अंकूश डांगे व त्यांचा भाऊ रविंद्र डांगे यांना मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांचे वडील अशोक डांगे यांना धरून त्यांच्या छातीत लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली.
या मारहाणीत अशोक हे जागेवर बेशुद्ध झाले.त्यांना उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डाँक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषीत केले. जखमी रविंद्र डांगे याच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी अंकूश अशोक डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब लोहकणे व अशोक बारकू माकूडे, मच्छींद्र भाऊसाहेब लोहकणे, पंकज भाऊसाहेब लोहकणे व प्रदीप अशोक माकूडे ( सर्व रा .डागपिंपळगाव) या पाच जणांविरोधात विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश बोऱ्हाडे हे करीत आहेत.दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी आरती बनसोडे यांनी घटनास्थळी भेट दिली.