तिहेरी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 11:26 PM2018-07-08T23:26:16+5:302018-07-08T23:26:33+5:30
एक गंभीर जखमी : वाहतूक विस्कळीत; औरंगाबाद -नगर महामार्गावरील दुर्घटना
लिंबेजळगाव : औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील लवकीच्या ओढ्याजवळ ट्रॅक्टर, ट्रक व टेम्पो तीन वाहनांच्या विचित्र अपघातात टेम्पोमधील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडला. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
रवीपाल नरेनपाल (५०, रा.दाजीर्लिंग, ह.मु चिखली, जि.बुलडाणा) असे अपघातात मयत झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. तर गोरख लक्ष्मण खसुरे (४४, रा. हडपसर, पुणे) असे जखमीचे नाव आहे.
उसाने भरलेला ट्रॅक्टर नेवाशाकडून औरंगाबादकडे येत असताना नादुरुस्त झाल्याने लिंबेजळगावजवळील लवकीच्या ओढ्याजवळ चालकाने उभा केला होता. घोडेगाव येथून मध्यप्रदेशकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक (एपी -१६ -टी व्ही १८३६) हा उभ्या असलेल्या या ट्रॅक्टरला येऊन धडकला. दरम्यान, याचवेळी पुणे येथून चिखलीकडे रोपवाटिकेचे झाडे घेऊन येणारा टेम्पो (एमएच -०४ -एफजे -२३०१) हा पाठीमागून या ट्रकवर आदळला. या भीषण अपघातात ट्रॅक्टर उसाच्या ट्रॉलीसह उलटले व त्यातील ऊस रस्त्यावर पडला. टेम्पोचा पुढील भाग ट्रकच्या पाठीमागील भागास धडकल्याने टेम्पोमध्ये बसलेले व्यापारी रविपाल यांचा जागीच मृत्यू झाला तर गोरख खसुरे हे जखमी झाले. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाळूजचे पो.नि. सतीशकुमार टाक, उपनिरीक्षक सागरसिंग राजपूत, पो.हे.कॉ. नामदेव मालोदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, ट्रॅक्टरचा चालक घटनास्थळाहून पसार झाला असून या प्रकरणाची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की, जवळील टोलनाका व आजूबाजूच्या परिसरात मोठा आवाज झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन तब्बल दीड कि.मी.वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यातील अनेक वाहनचालक विरूध्द दिशेने वाहन चालवत होते. पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली.
क्रेनच्या साह्याने ट्रॅक्टरचा समोरील भाग बाहेर काढून तो उभा करताना पोलिसांना कसरत करावी लागली.
असाच एक अपघात काही दिवसांपूर्वी ऊसाचा ट्रॅक्टर खराब झाल्याने २० नंबर खोलीजवळ छोटाहत्ती धडकून एक जखमी झाला होता.
महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले
वाळूज ते लोखंडी पूल या मार्गावर सतत अपघाताची मालिका सुरुच असल्याने वाळूज पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या महामार्गावर
शिवराई फाटा, लिंबेजळगाव लवकीच्या ओढ्याजवळ, लिंबेजळगाव बसस्थानकलगत, म्हसोबा परिसर, जिकठाण फाटा, रहीमपूर फाटा कॉर्नर, २० नंबर खोलीजवळ, दहेगावबंगला, इसारवाडी फाटा व लोखंडी पूल ही प्रसिद्ध अपघातस्थळे आहेत. या ठिकाणी अनेकांचा जीव जाऊन काहींना अपंगत्व आले आहे.