वर्षभरात मास्क न लावणाऱ्या ९०० लोकांना एक लाख ६० हजारांचा दंड (नियोजनाचा विषय)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:02 AM2021-03-21T04:02:12+5:302021-03-21T04:02:12+5:30
फुलंंब्री : औरंगाबाद जिल्ह्यात पोलीस प्रशासनाच्या वतीने शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करताना विनामास्क फिरणाऱ्या ९०० लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक ...
फुलंंब्री : औरंगाबाद जिल्ह्यात पोलीस प्रशासनाच्या वतीने शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करताना विनामास्क फिरणाऱ्या ९०० लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय अनेक दुकानांवरही दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दंडाची वसुली करण्यात आली.
जिल्ह्यात २१ मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यात सर्वप्रथम कोरोनापासून बचाव करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम जिल्हा पोलीस दलाकडून केले जात आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या कारवाईच्या आकडेवारीवरून ते दिसत आहे.
औरंगाबाद जिल्हा ग्रामीणमध्ये एकूण २३ पोलीस ठाणे आहेत. त्यांच्या हद्दीत गेल्या वर्षभरात कोरोनाची नियमावली न पाळणाऱ्यांवर एकूण २२ गुन्हे दाखल करण्यात आले. यात ११ हॉटेल, २ व्यायामशाळा, एका मंगल कार्यालयाचा समावेश आहे. ग्रामीण पोलिसांनी ३२४ ट्रिपल सीट वाहनधारकांवर केसेस करून त्यांच्याकडून ६४ हजार ८०० रुपये दंड वसूल केला.
गंगापुरात सर्वाधिक कारवाई
जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या ९०० लोकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख ६० हजार रुपये वसूल करण्यात आले. यात गंगापूर शहरातील सर्वाधिक १६१ लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सामाजिक बांधिलकी म्हणून ४ हजार २०५ लोकांना मास्क वापरण्याचे फायदे व मास्क न वापरल्याने होणारे नुकसान या संदर्भात प्रबोधन केले. त्यांना मास्कचे वाटप केल्याने पोलिसांनी कारवाईऐवजी जनजागृतीलाही महत्त्व दिल्याचे दिसून आले.
जानेवारी २०२१ पासून अडीचशे जणांवर कारवाई
जिल्हाभरात डिसेंबर २०२० पर्यंत कोरोना संक्रमित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले होते; पण जानेवारी २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. ही संख्या वाढतच असल्याने धोक्याची स्थिती निर्माण झाली, म्हणून ग्रामीण पोलिसांनी आपल्या कारवाईला वेग दिला आहे. गेल्या दोन महिन्यांत अडीचशे केसेस करण्यात आल्या. दररोज प्रत्येक पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर येत आहेत.
जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना कोविड-१९ संसर्गापासून बचावासाठी शासन निर्देशाप्रमाणे गर्दीची ठिकाणे टाळणे, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे तसेच मास्कचा वापर करणे याविषयी जनजागृती केली जात आहे, असे असतानासुद्धा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था, मंगल कार्यालय चालक, दुकानदार यांची गय केली जाणार नाही, त्यांच्याविरुद्ध तत्काळ साथरोग अधिनियम व विविध तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रत्येक पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.
-मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण.
---------
दाखल गुन्हे - २२
विनामास्क - ९००
ट्रिपल सीट - ३२४
मंगल कार्यालय -१
हॉटेल - ११