एक लाख अंगणवाडी बालकांचे ‘आधार’ रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 05:16 AM2018-06-18T05:16:41+5:302018-06-18T12:48:08+5:30
महिला व बालकल्याण विभागाने महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील ९७ अंगणवाडी पर्यवेक्षिकांना ‘टॅब’ दिले.
- विजय सरवदे
औरंगाबाद : महिला व बालकल्याण विभागाने महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील ९७ अंगणवाडी पर्यवेक्षिकांना ‘टॅब’ दिले. ‘फिंगर प्रिंट’ यंत्रही दिले; परंतु केवळ अधिकृत आधार कार्ड आॅपरेटर’ म्हणून त्यांना मान्यता न मिळाल्यामुळे महिनाभरापासून एकाही बालकाचे आधार कार्ड निघू शकलेले नाही. जिल्ह्यात सुमारे १ लाख ३० हजार बालकांची आधार कार्ड नोंदणी रखडली आहे.
अंगणवाडीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बालकांना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्याची जबाबदारी पर्यवेक्षिकांवर सोपविण्यात आली आहे. अधिकृत आॅपरेटर होण्यासाठी आधार कार्ड प्रादेशिक कार्यालयाकडून परीक्षा घेतली जाते. ती उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आॅपरेटरचा कोड मिळतो. त्यामुळे थेट आधार कार्ड कार्यालयाशी ‘लिंक’ होऊन कार्ड नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येते.
जिल्ह्यात ३ हजार ५०६ अंगणवाड्या असून, त्यामध्ये २ लाख २८ हजार बालकांची नोंदणी झालेली आहे. बोगस लाभार्थींना आळा बसविण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने १ एप्रिलपासून लाभार्थींची आधार नोंदणी आवश्यक केली आहे.
आठवडाभरात परीक्षा
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास अधिकारी मिरकले म्हणाले की, अधिकृत आॅपरेटरसाठीची परीक्षा आठवडाभरात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शुल्काचे चलनदेखील महिला व बालकल्याण विभागाने आधार कार्ड प्रादेशिक कार्यालयाकडे भरले आहे.