दुसऱ्या डोससाठी एक लाख नागरिक ‘वेटिंग’वर; पुरवठा होत नसल्यामुळे महापालिका हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:09 PM2021-07-23T16:09:40+5:302021-07-23T16:10:54+5:30
एकाच लॉटमध्ये पुरवठा होत नसल्यामुळे टोकन देऊनही नागरिकांना लस मिळत नसल्याची परिस्थिती
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोससाठी शहरातील सुमारे एक लाख नागरिक गुरुवारपर्यंत वेटिंगवर होते. १५ हजार लसींचा पुरवठा झाला तरच शुक्रवारपर्यंत नोंदणी झालेल्या नागरिकांना पुढील दोन दिवसांत दुसरा डोस देणे शक्य होणार आहे. लसींचा पुरवठा मागणीच्या तुलनेत व्हावा यासाठी शासनाला पत्र लिहून पालिका प्रशासन हतबल झाले आहे.
गुरुवारी लसींच्या सात हजार व्हायल्स चार तासांत संपल्या. एका व्हायल्समध्ये सुमारे ९ ते १० नागरिकांना डोस देता येतो. त्यामुळे वेटिंगवर असलेल्या एक लाख नागरिकांना दहा हजार व्हायल्स लागतील. परंतु एकाच लॉटमध्ये पुरवठा होत नसल्यामुळे टोकन देऊनही नागरिकांना लस मिळत नसल्याची परिस्थिती गुरुवारी अनेक केंद्रावर दिसून आली. पाच केंद्रांवर नोंदणी करणाऱ्या नागरिकांना पहिला, तर ३४ केंद्रांवर लसीचा दुसरा डोस देण्याची व्यवस्था पालिकेने शहरात केली होती. नोंदणी पहिल्या डोससाठी होती. एका सेंटरवर १५० लसींचा पुरवठा दुसऱ्या डोससाठी करण्यात आला होता. आता वेटिंग लिस्ट एक लाख झाली आहे. ८० हजार नागरिक बुधवारपर्यंत होते. गुरुवारी तो आकडा एक लाखांपर्यंत गेला. कोविशिल्ड लसींची मागणी शासनाकडे केली आहे. असे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
कोविशिल्डचा तुटवडा : आज लसीकरण नाही
सात हजार व्हायल्स गुरुवारी आल्या होत्या. शुक्रवारसाठी लसीकरणाचे नियोजन नाही. पहिल्या डोससाठी नोंदणी केली होती. दुसरा डोस ऑफलाइनच होता. ८४ दिवसांनंतर डोस द्यावा लागेल, अशा नागरिकांची संख्या एक लाखांपर्यंत झाली आहे. कोव्हॅक्सिनचे ३५०० डोस आहेत. तुटवडा मात्र कोविशिल्डचा आहे. साठा उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. लस पुरवठा न झाल्याने शुक्रवारी लसीकरण बंद राहणार आहे, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.
अवघ्या चार तासात संपली लस
महापालिकेला सात हजार लसी मिळताच आज गुरुवारी ३९ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. दुसरा डोस घेण्यासाठी ३४ केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. अवघ्या चार तासात लसींचा साठा संपला. कोव्हॅक्सिनची लस उपलब्ध असून, तीन केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांनी कूपन घेण्यासाठी केंद्रावर गर्दी केली. प्रत्येक केंद्रावर दीडशे लसींचा पुरवठा करण्यात आला होता. दिवसभरात सुमारे सहा हजार आठशे लस संपल्यामुळे उद्या शुक्रवारी शिल्लक लसीसाठी एखादे केंद्र सुरू राहील, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.
तीन केंद्रावर मिळेल कोव्हॅक्सिन लस
महापालिकेकडे कोव्हॅक्सिन लसीचे एक हजार डोस शिल्लक आहेत. त्यामुळे उद्या शुक्रवारी सकाळी दहा ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत क्रांती चौक, राजनगर आरोग्य केंद्र आणि सिडको एन-४ मधील एमआयटी हॉस्पिटल या तीन केंद्रांवर पहिला व दुसरा डोस मिळणार आहे. त्याकरिता ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. प्रत्येक सेंटरवर दोनशे लसींचा पुरवठा केला जाणार आहे.