एक लाख रुपये चोरणाऱ्याला सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:26 PM2019-07-04T23:26:55+5:302019-07-04T23:27:25+5:30
निजामाबाद-पुणे रेल्वेतील प्रवाशाच्या पँटच्या चोर खिशातून एक लाख रुपये चोरणारा केशव चंदू निखाते याला गुरुवारी (दि.४ जुलै) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एच. जोशी यांनी सहा महिने सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.
औरंगाबाद : निजामाबाद-पुणे रेल्वेतील प्रवाशाच्या पँटच्या चोर खिशातून एक लाख रुपये चोरणारा केशव चंदू निखाते याला गुरुवारी (दि.४ जुलै) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एच. जोशी यांनी सहा महिने सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.
यासंदर्भात व्यंकटेश्वर रामकिसन बेजमवार (रा. निजामबाद) यांनी फिर्याद दिली होती की, १४ सप्टेंबर १०१४ रोजी ते आणि त्यांचा मित्र औरंगाबादला येण्यासाठी निजामाबाद-पुणे रेल्वेत बसले होते. फिर्यादीला औरंगाबाद येथील सिडको परिसरात औषधी दुकान सुरू करायचे होते म्हणून त्यांनी आपल्यासोबत एक लाख रुपये रोख घेतले होते व ते पँटच्या चोर खिशात ठेवले होते. प्रवासात त्यांना झोप लागली. मुखेडहून एक व्यक्ती फिर्यादीच्या वरच्या बर्थवर बसला होता, तर अन्य दोन व्यक्ती फिर्यादीच्या बाजूच्या बर्थवर बसले होते. परभणी-पूर्णादरम्यान फिर्यादीला जाग आली असता, त्याने खिसा चाचपडून पाहिला असता, पैसे नसल्याचे लक्षात आले. पैशांची चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी तक्रार दिल्यावरून नांदेड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
तपासादरम्यान आरोपी केशव चंदू निखाते (४०, रा. शाहूनगर, वाघाळा, नांदेड) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने चोरी केल्याची कबुली दिली व स्वत:च्या घरातून चोरीचे ७० हजार रुपये काढून दिले. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी, सहायक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३७९ अन्वये वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला.
----------