शहर बसचा गल्ला दररोज एक लाख दहा हजार रुपये
By | Published: November 22, 2020 09:01 AM2020-11-22T09:01:19+5:302020-11-22T09:01:19+5:30
औरंगाबाद : राज्य शासनाने अनलॉकअंतर्गत शहर वाहतूक बससेवा सुरू करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेला परवानगी दिली. ५ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात फक्त ...
औरंगाबाद : राज्य शासनाने अनलॉकअंतर्गत शहर वाहतूक बससेवा सुरू करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेला परवानगी दिली. ५ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात फक्त ३० बस रस्त्यावर धावत आहेत. दररोज ६ हजार प्रवासी या बससेवेचा लाभ घेत आहेत. स्मार्ट सिटी प्रायव्हेट लिमिटेडला बससेवेपोटी दररोज १ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार असल्यामुळे शहर वाहतूक बस आणखी व्यापक प्रमाणात सुरू करावी किंवा नाही या संभ्रमात प्रशासन आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत औरंगाबाद महापालिकेत १०० शहर बसची खरेदी केली आहे. कोरोनामुळे सात महिन्यांपासून ७० बस उभ्या होत्या. उर्वरित ३० बसचा वापर कोरोना रुग्णांसाठी करण्यात आला होता. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ५ नोव्हेंबरपासून शहर बस सुरू करण्यास परवानगी दिली. पहिल्या टप्प्यात ३० बस रस्त्यावर धावत आहेत. काही मार्गांवर बसला उत्तम प्रतिसाद आहे. एका बाजूने प्रवासी भरून बस येते, तर दुसऱ्या बाजूने रिकामी जाते. त्यामुळे स्मार्ट सिटी काॅर्पोरेशनला दररोज ३ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. शहर बसचा वापर पूर्वीच्या तुलनेत कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दुसऱ्या टप्प्यात २६, तर तिसऱ्या टप्प्यात २८ शहर बस सुरू करण्याचा विचार महापालिकेचा आहे.
बसचे दररोज निर्जंतुकीकरण
शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार शहर बसचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक प्रवासी फेरीनंतर निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाचा वापर करण्यात येत आहे. प्रवाशांच्या काळजीसाठी सर्व व्यापक उपाययोजना करण्यात येत असल्याचे शहर बस विभागाचे प्रमुख प्रशांत भुसारी यांनी सांगितले.
फिजिकल डिस्टन्सची अडचण
शहरातील काही मार्गांवर शहर बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गांवर मोठ्या संख्येने प्रवासी बसचा वापर करीत आहेत. वाळूजहून औरंगाबादकडे येणाऱ्या बसमध्ये मोठ्या संख्येने नागरिक असतात. अशावेळी सोशल डिस्टन्सची अडचण होत आहे. एकाच वेळी बसमध्ये मोठ्या संख्येने नागरिक येतात, त्यामुळे ही अडचण होत असल्याचे सांगण्यात आले.
रिक्षाचालक सोयीनुसार घेतात भाडे
शहर बसला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना किलोमीटरनुसार भाडे घेण्यात येते. ज्या ठिकाणी सर्वाधिक शहर बस आहेत त्या ठिकाणी रिक्षाचालक आपल्या सोयीनुसार भाडे घेतात. त्यामुळे असंख्य नागरिक बसऐवजी रिक्षाला प्राधान्य देत आहेत. अनेक मार्गांवर रिक्षाच्या तुलनेत बसचे भाडे अत्यंत कमी आहे.
शहर बस आणि रिक्षा भाडेमधील तफावत
प्रवासाचे ठिकाण- रिक्षा - बस
औरंगपुरा ते रांजणगाव-४०-२५
रेल्वे स्टेशन ते शाहगंज -३०-१५
रेल्वे स्टेशन ते सावंगी - ४०- २५
औरंगपुरा ते शिवाजीनगर -२०-२०
दररोज ३० बस धावतात
कोरोना संसर्गाचे प्रमाण मागील दोन महिन्यांत अत्यंत कमी झाले होते. त्यामुळे शहर बससेवा सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ३० बस शहरातील प्रमुख मार्गांवर धावत आहेत. या बस दररोज सहा हजार किलोमीटर प्रवास पूर्ण करतात.