गायरान जमिनीच्या वादात एकाचा खून
By Admin | Published: July 11, 2014 12:46 AM2014-07-11T00:46:46+5:302014-07-11T01:04:24+5:30
फुलंब्री : तालुक्यातील जातेगाव येथे गायरान जमिनीच्या वादातून एकाचा खून झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
फुलंब्री : तालुक्यातील जातेगाव येथे गायरान जमिनीच्या वादातून एकाचा खून झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
जातेगाव येथील गट क्रमांक ६५ मध्ये सुनील तेजराव शेजवळ व कोडिंबा उत्तम मालवणकर या दोघांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केले होते. याच जमिनीवरून दोघांचा दोन वर्षांपासून वाद सुरू होता. या पूर्वीही त्यांच्यात भांडणे झाली होती. याविषयी पोलिसांत तक्रारही दाखल आहे. गुरुवारी सुनील शेजवळ हा त्या जमिनीत पेरणी करण्यास गेला असता कोंडिबा मालवणकर तेथे गेला व ही जमीन माझी आहे असे सांगून आडवा झाला. यात दोघांत वाद सुरू झाला. यात कोंडिबा मालवणकर याला लाठ्या-काठ्याने मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. फुलंब्रीचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी जातेगाव येथे जाऊन पंचनामा केला. या प्रकरणात पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.