रस्ता एक अन् बाता अनेक ! एका रस्त्याचे सहा वर्षांत चार वेळा भूमिपूजन, आता तरी सुरु व्हावे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 03:28 PM2021-11-24T15:28:24+5:302021-11-24T15:30:51+5:30
Eknath Shinde's Aurangabad Visit: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आता तरी काम चालू होईल का? नाही तर पुन्हा पाचव्यांदा भूमिपूजन करावे लागेल.
औरंगाबाद : मागील सहा वर्षांत बाळकृष्णनगर-विजयनगरातील शिवनेरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे चार वेळा भूमिपूजन झाले(Bhumipujan of a road four times in six years in Aurangabad ) . एका रस्त्याच्या कामासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय व्यासपीठावरून बाता झोडल्या. परंतु रस्त्याचे काम काही सुरू झाले नाही. मंगळवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा त्या रस्त्याच्या भूमिपूजनाचा बार उडविण्यात आला. यावेळी तरी रस्त्याचे काम होणार की नाही, असा प्रश्न भाजपने केला आहे. तर रस्त्याच्या कामामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत ‘ग्राऊंड लेव्हल’ चे राजकारण पेटले आहे.
१० जानेवारी २०२१ रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रस्त्याच्या कामासाठी भूमिपूजन केले. त्यासाठी शासनाकडून ४९ लाख रुपये विशेष निधी माजी नगरसेविका ज्योती मोरे यांनी मंजूर करून घेतला. मनपाने ४९ लाख रुपयांची निविदांसह वर्कऑर्डर काढून जाधव कंत्राटदाराला कामही दिले. काम वेळेत सुरू केले नाही, म्हणून कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्ट’ करण्यात आले. नंतर माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी आ. संजय शिरसाट यांच्यामार्फत निधी मिळविला. पुन्हा एकदा जंगी शक्तिप्रदर्शन करीत शिरसाट आणि जंजाळ यांनी वॉर्डात नगरविकास मंत्र्यांना आणून महाविकास आघाडीतील आलबेल कारभाराला डिवचत फक्त सेना नेत्यांचे व्यासपीठ भरविले. मंगळवारच्या कार्यक्रमाला मंत्री संदिपान भुमरे, माजी खा. चंद्रकांत खेैरे, आ. अंबादास दानवे, खा. हेमंत पाटील, नंदकुमार घोडेले, विनोद घोसाळकर, राजू वैद्य आदींची उपस्थिती होती.
आ. शिरसाटांनी लगावला टोला
आ. शिरसाट यांनी भूमिपूजनाची चौथी वेळ असल्याचे सांगून अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मंत्री आले; पण काम काही सुरू झाले नसल्याचा टोला लगावला. या पूर्व मतदारसंघाचे आमदार दुसरे आहेत. (भाजपचे नाव न घेता) परंतु येथील जनता आपली आहे, म्हणून निधी आणल्याचे ते म्हणाले.
शिंदे म्हणाले, यावेळी तरी काम सुरू करा
नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले, आता तरी काम चालू होईल का? नाही तर पुन्हा पाचव्यांदा भूमिपूजन करावे लागेल.
भाजप आमदारांच्या मतदारसंघात
आ. सावे यांच्या मतदारसंघातील वॉर्डात रस्त्यासाठी निधी आणून भाजपच्या मुसक्या आवळल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसची मनपा निवडणुकीत गरज राहणार नाही, असा इशाराही देऊन टाकला. तसेच आ. हरिभाऊ बागडे यांच्या घरासमोरील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून शिरसाट यांनी त्यांनाही डिवचले.
आ. अतुल सावे यांचे प्रत्युत्तर
आ. अतुल सावे म्हणाले, चार वेळा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेच भूमिपूजन केले. दिवाकर रावते, खैरे, टोपे यांनी भूमिपूजन केल्याचे सर्वांना माहिती आहे. त्या कामासाठी मनपाने एनओसीदेखील दिली. त्यामुळे मला त्या रस्त्याचे काम करता आले नाही. मनपाने एनओसी दिल्यानंतर दुसरा निधी तेथे वापरता येत नाही. त्यामुळे काम झाले नाही. आता ते व्हावे, ही अपेक्षा आहे.