नोकराने केला घात; एकतर्फी प्रेमातून मालकाच्या मुलीचा गळा घोटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 12:47 PM2021-11-11T12:47:37+5:302021-11-11T12:49:53+5:30
खून करून मृतदेह स्वतःच्या घरात ठेऊन तरुणीच्या भावासोबत शोध घेत फिरला
औरंगाबाद : स्वत:च्या घरी ठेवून सात वर्षे सांभाळीत पोटापाण्याला लावलेल्या परप्रांतीय नोकरानेच मालकाच्या मुलीचा काटा काढला. (servant kills the owner's daughter) मुकुंदनगरातील खुनाचा उलगडा अवघ्या २४ तासांच्या आत करण्यात मुकुंदवाडी पोलिसांना यश आले असून आरोपीला लोणावळ्यात अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील बरखू राय हे औरंगाबादेत पोट भरण्यासाठी आले होते. त्यांनी सात वर्षांपूर्वी गावातील भोलाकुमार कुंजन मास्टर कुमार यास प्लम्बिंगचे काम करण्यासाठी सोबत आणले. त्याला स्वत:च्या घरीच ठेवले. बरखू यांची मुलगी इंदूसोबत दोन वर्षांपूर्वी त्याचे प्रेमसंबंध जुळले. दोन महिन्यांपूर्वी इंदूच्या भावाला हे समजले. त्यामुळे त्याने भोलाकुमार याला घराबाहेर काढून राजनगरात भाड्याने खोली घेऊन दिली. त्यानंतर इंदूचेही भोलासोबतचे बोलणे बंद झाले. तिने त्याचा मोबाईल ब्लॅक लिस्टमध्ये टाकला होता. भोला इंदूच्या घरी गेल्यानंतरही ती कोणाशी फोनवर बोलताना त्याला दिसत असे. त्यामुळे भोलाकुमार प्रचंड अस्वस्थ होता. त्याने सोमवारी रात्री ७ वाजता इंदूला त्याच्या खोलीवर बोलावून घेतले. तेथे तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला.
खून केल्यानंतर भोलाकुमारने इंदूच्या भावाला फोन करून ती मुकुंदवाडी गेट ५६ परिसरात एका मुलाच्या गाडीवर बसून जाताना दिसल्याची थाप मारली. तिला शोधण्यासाठी जाऊ असेही सांगितले. भोलाकुमार आणि इंदूचा भाऊ दोघे दुचाकीवरून तिचा शोध घेऊ लागले. पण ती न सापडल्यामुळे रात्री ११ वाजता मुकुंदवाडीत तक्रार देण्यासाठी निघालेल्या भावास भोलाने अडवून मंगळवारी तक्रार देण्याचे ठरविले. त्यानंतर भोला घरी आला, तेव्हा मृतदेह घरात होता. घरात पाणी नसल्याचा बहाणा करून भोलाने बरखू राय यांच्या घरी जाऊन दुचाकी घेऊन आला. त्या दुचाकीवरून इंदूचे गादीत गुंडाळलेला मृतदेह राजनगरातील मोकळ्या मैदानात आणून टाकला. त्यानंतर दुचाकी परत केली. दुसऱ्या दिवशी सकाळी भोलाकुमार पुण्याला पळून गेला. मंगळवारी सकाळी ११ वाजता इंदूचा भाऊ तक्रार देण्यास ठाण्यात आला तेव्हा त्यास मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. त्याने मृतदेह पाहून तो इंदूचाच असल्याचे सांगितले. तेव्हा इंदूच्या कुटुंबाने भोलावर संशय व्यक्त केला होता. तसेच भोलाचा मोबाईलही बंद येत असल्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय अधिक बळावला. उपनिरीक्षक वैशाली गुळवे अधिक तपास करत आहेत. ही कामगिरी निरीक्षक मनोज पगारे, दुय्यम निरीक्षक ब्रह्मा गिरी, उपनिरीक्षक श्रीकांत भराटे, सुखदेव काळे, वैशाली गुळवे, सहायक उपनिरीक्षक संजय देशमुख, नाईक सुखदेव जाधव, समाधान काळे, खय्यमू शेख आदींनी केली.
लोणावळ्यात पकडला आरोपी
खून करून पळून गेलेल्या भोलाकुमारला पकडण्यासाठी मुकुंदवाडी ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीकांत भराटे, नाईक बाबासाहेब कांबळे, नृसिंग पवार, सुधाकर पाटील यांचे पथक मंगळवारी सायंकाळी लोणावळ्याला रवाना झाले. रातोरात लोणावळा गाठून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला पकडण्यात आले. बुधवारी औरंगाबादेत आणून अटक करण्यात आली.