एकच उपाय, पदाधिकाऱ्यांनो राजीनामे द्या !
By सुमेध उघडे | Published: January 31, 2019 12:11 PM2019-01-31T12:11:55+5:302019-01-31T12:12:28+5:30
धुमसता कचरा : कचऱ्याचा प्रश्न कधी सुटणार या प्रश्नाने चिंताग्रस्त असलेल्या औरंगाबादकरांच्या मनात काय आहे, यासंदर्भात ‘लोकमत’ ने शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण करून कचराकोंडीसंदर्भात त्यांची मते जाणून घेतली.
- सुमेध उघडे
कचराकोंडीने त्रस्त झालेल्या औरंगाबादकरांना आणि न्यायालयाला महापालिकेने अनेक आश्वासने दिली. कचऱ्याचा प्रश्न निर्माण होऊन आता वर्ष होत आले. मात्र, कोंडी फुटलेली नाही. उलट कचरा अधिकच धुमसतोय. कचऱ्याचा प्रश्न कधी सुटणार या प्रश्नाने चिंताग्रस्त असलेल्या औरंगाबादकरांच्या मनात काय आहे, यासंदर्भात ‘लोकमत’ ने शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण करून कचराकोंडीसंदर्भात त्यांची मते जाणून घेतली.
‘लोकमत’ने ऑनलाईन घेतलेल्या या सर्व्हेला नागरिकांना जोरदार प्रतिसाद दिला. या सर्वेक्षणात नागरिकांना केवळ तीनच प्रश्न विचारण्यात आले होते. १९ वर्षांच्या तरुणांबरोबरच ७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांनी आपली मते सर्वेक्षणात नोंदविली आहेत. ही मते नोंदविताना पदाधिकाऱ्यांनी राजिनामे द्यावेत, अशी भूमिका नागरिकांनी घेतली; त्याचबरोबर महापालिकेच्या कारभारावर आसूडही ओढले. अनेक नागरिकांनी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेला चांगल्या सूचनाही केल्या...
कचरा प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांनी महापालिकेला केलेल्या सूचना :
- वेळ, पैसा वाया न घालता निस्वार्थीपणे काम करावे.
- पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी इच्छाशक्ती दाखवावी.
- ओमप्रकाश बकोरिया किंवा सुनील केंद्रेकर आयुक्त हवेत.
- राजकारणापलीकडे जाऊन शहराचा विकास कसा होईल यावर लक्ष द्यावे
- महापालिका बरखास्त करा.
- तात्काळ निर्णय घ्या, नागरिकांच्या आरोग्याचा खेळ मांडू नका.
- मनपाने कितीही कचरा उचलला, तरीही नागरीक सुधारणार नाहीत.
- कचऱ्यात पैसे खाऊ नका.
- एवढे बेसिक प्रश्न सोडविता येत नसतील तर राजीनामे देऊन सत्ता सोडावी.
- नवीन कल्पक विद्यार्थी आणि नागरिकांना कचरा व्यवस्थापन करण्यासाठी आमंत्रित करायला हवे. कचरा प्रश्नांची जनजागृतीसुद्धा आवश्यक आहे.
- स्वत:च्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावायला पाहिजे.
- आपली महापालिका सूचना देण्यापलीकडे आहे...सत्ताबद्दल झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही.
- केवळ महापालिकेच्या इमारतीत बसून चर्चा करून कचराकोंडी सुटणार नाही.
- पालिकेने कचरा प्रश्न सोडविण्यासाठी आलेल्या सर्व फंड प्रामाणिकपणे वापरावा. पारदर्शीपणे आपले काम करावे. जनतेचीसुद्धा आवश्यक ठिकाणी मदत घ्यावी.
- एक वर्षापासून फक्त कचरा प्रश्न सुटत नसेल तर जनतेचे बाकीचे प्रश्न काय सोडवणार ? तुम्ही जनतेसमोर स्पष्ट सांगा आमच्याकडून हा प्रश्न सुटणार नाही, मग काय करायचे ते जनताच ठरवेल.
- कचरा विघटन मशीन आणल्या पाहिजेत, ही काळाची गरज आहे, कचरा समस्या फार गंभीर होत चालली आहे. लवकरात लवकर कचरा व्यवस्थापन करावे.
- जमत नसेल तर दुसऱ्यांना संधी द्या.
- आपल्या कुटुंबाचे काम असल्यासारखे करा. जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करा. सर्वच कामात 'कट प्रॅक्टिस' गरजेची नाही.