चोवीस तासांत एक फुटाची वाढ
By Admin | Published: September 11, 2014 01:28 AM2014-09-11T01:28:46+5:302014-09-11T01:34:35+5:30
पैठण : जायकवाडी धरणाचा जलसाठा ४० टक्क्यांपेक्षा जास्त झाला असून, धरणात आवक चांगली होत असल्याने मंगळवारपासून धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
पैठण : जायकवाडी धरणाचा जलसाठा ४० टक्क्यांपेक्षा जास्त झाला असून, धरणात आवक चांगली होत असल्याने मंगळवारपासून धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणी पातळीत एक फुटाने वाढ झाली आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून मोठा विसर्ग होत असल्याने जायकवाडीत २२०५० क्युसेक्स क्षमतेने आवक होत आहे.
गेल्या दोन दिवसांत नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात धो-धो पाऊस बरसला. यामुळे तेथील धरणातून सोमवारपासून विसर्ग करण्यात येत होता. मंगळवारी दुपारनंतर या विसर्गात मोठी वाढ केल्याने जायकवाडीत आवक वाढत गेली.
आज बुधवार रोजी मुळा धरण- १५००, भंडारदरा- १४२१, दारणा- ७३५५, गंगापूर- २६८५, नांदूर-मधमेश्वर- १३८९१, ओझर वेअर- ४४३१, निळवंडे- ३६११ क्युसेक्स असा विसर्ग सुरू आहे. यामुळे धरणात २२०५० क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणे १०० टक्के भरलेली आहेत. यामुळे ओझर वेअरद्वारे या धरणातून ४४३१ क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण ९५.२४ टक्के, गंगापूर- ९३.४६ टक्के, करंजवन- ८९.८९ टक्के व पालखेड- १०० टक्के भरलेले आहे व पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी या धरणात येत असल्याने या धरणातून नांदूर-मधमेश्वर वेअरमधून १३८९१ क्युसेक्सने गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे.