जोगेश्वरीत एकाचे डोके फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:04 AM2021-01-14T04:04:41+5:302021-01-14T04:04:41+5:30
वाळूज महानगर : दुचाकीचा धक्का मारणाऱ्यास जाब विचारला म्हणून एकास मारहाण करून त्याचे डोके फोडल्याची घटना मंगळवारी (दि.१२) जोगेश्वरीत ...
वाळूज महानगर : दुचाकीचा धक्का मारणाऱ्यास जाब विचारला म्हणून एकास मारहाण करून त्याचे डोके फोडल्याची घटना मंगळवारी (दि.१२) जोगेश्वरीत घडली.
रावसाहेब केशव मोरे (रा.जोगेश्वरी) हे मंगळवारी जि. प. शाळेकडे जात असताना त्यांना दुचाकीस्वार दोघांनी पाठीमागून धडक दिली. यामुळे मोरे यांनी दुचाकीस्वार संदीप भावले व दत्तु भंडारे यांना जाब विचारला असता त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------
कमळापूररोडवर दारू पकडली
वाळूज महानगर : कमळापूर-वाळूज रस्त्यावर देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या भारत पवार (रा.कमळापूर) यास मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी पकडले. पोलीस पथकाने छापा मारून दारू विक्री करणाऱ्या भारत पवार यास पकडले. आरोपी भारत पवार याच्या ताब्यातून ८८४ रुपये किमतीच्या १७ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या .
-----------------------
रांजणगावातून कामगार बेपत्ता
वाळूज महानगर : कंपनीत कामाला जातो, असे म्हणून घराबाहेर पडलेले कामगार सोनबा वामन मुनेश्वर (वय ३६, रा. रांजणगाव) हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली. सोमवारी सकाळी ते कंपनीत कामाला जातो, असे म्हणून घराबाहेर पडले. मात्र, अद्यापपर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांची पत्नी ज्योती मुनेश्वर यांनी ठाण्यात धाव घेतली. पोहेकॉ वसंत जिवडे हे शोध घेत आहेत.
फोटो क्रमांक-सानबा मुनेश्वर (बेपत्ता)
---------------------------
ज्ञानभवन शाळेत अभिवादन
वाळूज महानगर : बजाजनगरातील ज्ञानभवन शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली. उद्योजक हनुमान भोंडवे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मुख्याध्यापिका शारदा बर्डे, वैभव पवार, बाळू देवढे आदींची उपस्थिती होती.
----------------------------
वाळूजमहानगरात वाण खरेदीसाठी गर्दी
वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात संक्रांतीचे वाण खरेदी करण्यासाठी सुवासिनी महिलांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. या भागातील बजाजनगर, पंढरपूर, वाळूज, रांजणगाव, सिडको वाळूजमहानगर आदी ठिकाणी महिलांनी बाजारपेठेत जाऊन वाण व पूजेचे साहित्य, साड्या, दागिने आदींची खरेदी केली. बऱ्याच दिवसांनंतर चांगली विक्री झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
------------------------