पोस्टल बँकेत एक हजार ग्रामस्थांनी उघडले खाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:03 PM2019-07-01T23:03:16+5:302019-07-01T23:03:20+5:30
पाटोदा येथे सोमवारी टपाल विभागातर्फे डिजीटल इंडिया उपक्रमाची जनजागृती करण्यात आली.
वाळूज महानगर : पाटोदा येथे सोमवारी टपाल विभागातर्फे डिजीटल इंडिया उपक्रमाची जनजागृती करण्यात आली. या उपक्रमांतर्गत टपाल विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी गावातील जवळपास १ हजार ग्रामस्थांचे टपाल कार्यालयात खाते उघडण्यात आले आहे.
भारत सरकारतर्फे चार वर्षांपासून डिजीटल इंडिया हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोमवारी पाटोदा येथे टपाल विभागाच्यावतीने जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक बी.के.राहुल, सहा.अधीक्षक अनिल साळुंके, गणेश कुलकर्णी, गजेंद्र जाधव, बबन गरड, सुभाष सुखधान, गणेश मरमट, सरपंच भास्कर पेरे, उपसरपंच विष्णू राऊत, ग्रामविकास अधिकारी पी.एस.पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात राहुल, अनिल साळुंके, गणेश कुलकर्णी यांनी पोस्ट पेमेंट बँक, आधार नोंदणी, पोस्टल लाईफ इन्श्युरन्स, डिजीटल उत्पादने आदींविषयी नागरिकांना माहिती दिली. देशभरात १ लाख ५५ हजार टपाल कार्यालये असून, यातील ९० टक्के कार्यालये ही ग्रामीण भागात आहेत. कार्यक्रमाला भारत गवळी, विशाल मांडे, अरुण आरगडे, दिपाली पेरे आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आठवडाभरापासून उपक्रम
डिजीटल इंडिया उपक्रमाविषयी टपाल विभागाच्या वतीने आदर्श पाटोदा गावात आठवडाभरपासून जनजागृती करण्यात येत आहे. विविध योजनांची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी टपाल विभागात खाते उघडण्यास सुरवात केली आहे. शून्य शिलकीवर खाते उघडले जात असल्याने गावातील महिला व ग्रामस्थांची खाते उघडण्यासाठी गर्दी होत आहे. आठवडाभरात ७५० महिला व २४७ पुरुषांनी खाते उघडल्याची माहिती सरपंच भास्कर पेरे, ग्रामविकास अधिकारी पी.बी.पाटील यांनी दिली.