पेट्रोलपंपावर महिला, पुरुषांसाठी स्वच्छतागृह एकच तेही कुलुपबंद; कुचंबणा कशी टाळणार?
By प्रशांत तेलवाडकर | Published: March 18, 2023 01:44 PM2023-03-18T13:44:15+5:302023-03-18T13:45:46+5:30
पेट्रोल पंपावर पिण्याचे पाणी, टायर ट्यूबमध्ये हवा मोफत; जाणून घ्या आणखी कोणत्या सुविधा असाव्यात
छत्रपती संभाजीनगर : पेट्रोलपंपावर वाहनधारकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, तिथे टायर ट्यूबमध्ये मोफत हवा भरण्यात यावी, एवढेच नव्हे तर स्वच्छतागृह तिथे असलेच पाहिजे, असा करारच तेल कंपनी व पेट्रोलपंपचालकांमध्ये झालेला असतो. पंपावर पाणी व मोफत हवा भरण्याची व्यवस्था दिसून आली; पण महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाचा अभाव दिसून आला. दोघांसाठी एकच स्वच्छतागृह व तेही कुलूप बंद होते. यामुळे अनेकदा ग्राहकांची विशेषत: महिलांची यामुळे कुचंबणा होताना दिसून येत आहे.
या सुविधा पंपावर हव्याच
पेट्रोलपंप म्हणजे नुसती पेट्रोल व डिझेल भरण्यापुरती सेवा मर्यादित नाही.
१) ग्राहकांना येथे मापात माप न करता पेट्रोल- डिझेल मिळाले पाहिजे.
२) ग्राहक कॅश पेमेंट करो वा ऑनलाइन ते स्विकारले पाहिजे.
३) स्वच्छ पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था असलीच पाहिजे.
४) वाहनाच्या टायरट्यूबमध्ये मोफत हवा भरण्याची सुविधा असावी.
५) स्त्री व पुरुषांसाठी स्वच्छतागृह स्वतंत्र व स्वच्छ असावे.
६) प्रथमोपचाराची सुविधाही दर्शनी भागात ठेवण्यात यावी.
७) पेट्रोल, डिझेलच्या गुणवत्तेवर ग्राहकाला संशय आल्यास तपासणीकरिता फिल्टर पेपर टेस्टची मोफत व्यवस्था पंपावर असलीच पाहिजे.
या पेट्रोलपंपावर ‘लोकमत’ने काय पाहिले?
पेट्रोल पंप : क्रांतीचौक
पाणी : पाण्याची व्यवस्था; पण पाठीमागील बाजूस.
वाहनांसाठी मोफत हवा : सुविधा होती.
स्वच्छतागृह : स्वच्छतागृह आहे; पण महिला, पुरुषांसाठी एकच.
-----------
पेट्रोल पंप : काल्डा कॉर्नर रस्ता
पाणी : व्यवस्था आहे; पण ग्राहक वापरत नव्हते.
वाहनांसाठी मोफत हवा : सुविधा आहे.
स्वच्छतागृह : महिला- पुरुषांसाठी एकच स्वच्छतागृह, त्यास कुलूप.
-------------
पेट्रोल पंप : टीव्ही सेंटर परिसर
पाणी : व्यवस्था आहे.
वाहनांसाठी मोफत हवा : सुविधा आहे.
स्वच्छतागृह : एकच स्वच्छतागृह
-----------
पेट्रोलपंप : शहागंज परिसर
पाणी : व्यवस्था नाही.
वाहनांसाठी मोफत हवा : सुविधा नाही
स्वच्छतागृह : नाही
---------------
पेट्रोल पंप : बीड बायपास
पाणी : व्यवस्था आहे.
वाहनांसाठी मोफत हवा : सुविधा आहे.
स्वच्छतागृह : एकच स्वच्छतागृह तेही कुलूप बंद
जिल्हाधिकाऱ्यांना असतात कारवाईचे अधिकार
तेल कंपन्या व पेट्रोलपंपचालकांमध्ये जो करार होतो, त्यातच ग्राहकांना मूलभूत सुविधांचा उल्लेख केलेला असतो. नुसते वाहनधारकच नव्हे, तर इतर नागरिकांनाही सुविधा मिळावी. नियमानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या सुविधा मिळतात की, नाही याची तपासणी करणे आवश्यक असते. जर पंपावर मूलभूत सुविधा दिली जात नसेल तर ग्राहकांना यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करण्याचे अधिकार आहेत. मात्र, या अधिकाराचा वापर ग्राहक करत नाही, कारण कायदे, नियमांबद्दल जागृती नसणे हेच मुख्य कारण आहे.