गाडी एकाची, वाहतूक पोलिसांनी चालान फाडले दुसऱ्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:04 AM2021-05-30T04:04:26+5:302021-05-30T04:04:26+5:30
कन्नड : त्यादिवशी गाडी घराच्या परिसरातून निघालेली नाही. मात्र, वाहतूक पोलिसांनी दंडाचे चालान फाडल्याचा संदेश मोबाइलवर आल्याने गाडीमालकाला आश्चर्याचा ...
कन्नड : त्यादिवशी गाडी घराच्या परिसरातून निघालेली नाही. मात्र, वाहतूक पोलिसांनी दंडाचे चालान फाडल्याचा संदेश मोबाइलवर आल्याने गाडीमालकाला आश्चर्याचा धक्काच बसला. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे टाकून वाहतूक पोलिसांनी ‘अंधेर नगरी चौपट राजा’ या खेळाचा परिचय दिला.
शहरातील संतोषी माता कॉलनी येथे राहणारे दीपक परदेशी हे सिल्लोड येथे सहायक निबंधक कार्यालयात सहकार अधिकारी आहेत. त्यांच्याकडे कार (क्र. एमएच-२० सीएच-६१७७) असून, २७ मे रोजी सकाळी १०.२३ वाजता त्यांच्या चारचाकी वाहनाचे दोनशे रुपये दंडाचे चालान फाडल्याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर आला. त्यांनी लगेच ट्रॅफिक पोलीस ॲपवर चालानची तपासणी केली. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण चालानसोबत जोडण्यात आलेले छायाचित्र हे कारचे नसून हायवाचे होते. ज्यावेळी चालानचा मेसेज आला त्यावेळी कार घराच्या कंपाउंडमध्ये होती. परदेशी यांनी त्याच ॲपवर तक्रार अर्ज भरून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला.
----
पोलिसांचा नेमका उद्देश तरी काय
चालानसोबत जोडलेल्या छायाचित्रातील हायवाचा क्रमांक व कारचा क्रमांक एकच आहे का, त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. छायाचित्र काढताना संबंधित वाहनाचा क्रमांक ठळकपणे दिसणे आवश्यक असताना तसे छायाचित्र का काढले नाही? दीपक परदेशी यांच्या वाहनाचेच चालान कसे फाडण्यात आले? संबंधित चालान फाडणारा वाहतूक पोलीस कर्मचारी कोण, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.