डेंग्यूचा पुन्हा एक बळी
By Admin | Published: September 20, 2016 12:21 AM2016-09-20T00:21:16+5:302016-09-20T00:23:50+5:30
औरंगाबाद : शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूचा उद्रेक सुरू असून, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लेबर कॉलनीत चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला होता.
औरंगाबाद : शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूचा उद्रेक सुरू असून, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लेबर कॉलनीत चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. यानंतरही डेंग्यू रोखण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस शहराभोवती डेंग्यूचा विळखा वाढत असून, या आजाराने एका युवतीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली.
शेख सादिया फारुक (१८, रा. देवळाई, मूळ रा. नायगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. प्रकृती खालावल्यामुळे १७ सप्टेंबर रोजी तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डेंग्यूमुळे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे १८ सप्टेंबर रोजी रात्री तिचा मृत्यू झाला.
जिल्हा हिवताप कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या कालावधीत डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यातही ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात डेंग्यूचा उद्रेक अधिक आहे. डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन अशा ठिकाणची डासांची अळी नष्ट केली जाते. ज्याठिकाणी हे शक्य होत नाही, त्याठिकाणी अॅबेट टाकून डासांची अळी नष्ट केली जाते. यासह कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाययोजना करूनही डेंग्यूचा विळखा कमी होत नसल्याचे दिसते. शहरातील विविध भागांमध्ये डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजाराचा कहर पाहता मनपा आणि आरोग्य विभाग करीत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत. सातारा, देवळाई, पुंडलिकनगर, लेबर कॉलनी, गारखेड्यासह विविध भागांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या मोठी आहे.
प्रकृती गंभीर
रुग्ण ज्यावेळी दाखल झाला, तेव्हा प्रकृती गंभीर होती. तरीही डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. रुग्णाचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला, अशी माहिती कमलनयन बजाज रुग्णालयाचे सीईओ डॉ. व्यंकट होळसांबरे यांनी दिली.
डेंग्यूने शहरात कोणाचाही मृत्यू नाही- महापालिकेचा दावा
शहरातील १६६ वसाहतींमध्ये डेंग्यूने थैमान घातले असून, आतापर्यंत सहापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण डेंग्यूसदृश आजाराने मृत्यूशी झुंज देत आहेत. महापालिका प्रशासन दरवर्षीप्रमाणे एकाही रुग्णाचा डेंग्यूने मृत्यू झाला नसल्याचा खळबळजनक दावा करीत आहे.
४ डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याऐवजी आरोग्य विभाग नागरिकांच्या जखमांवर मीठ चोळत जनजागृतीवर अधिक भर देत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात डेंग्यूने डोके वर काढले आहे.
४पंधरा दिवसांपूर्वी लेबर कॉलनी येथील साडेपाचवर्षीय चिमुकली माहिम सुलताना मीर आसिफ अली हिचा मृत्यू झाला. शिवाजीनगर येथील अवघ्या एकवर्षीय चिमुकल्याचा डेंग्यूने मृत्यू झाला. सोमवारी सातारा-देवळाई परिसरातील १७ वर्षीय शेख सादिया या युवतीचा मृत्यू झाला. याशिवाय आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मागील तीन महिन्यांमध्ये डेंग्यूने शहरात ६ जणांचा मृत्यू झालेला असतानाही महापालिकेचा आरोग्य विभाग एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा करीत आहे.
जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक नाही. डेंग्यूमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. विषाणूजन्य तापामुळे मृत्यू झाले आहेत. डेंग्यू नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.