तब्बल अडीचशे गावांत ‘एक गाव एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:46 AM2017-08-29T00:46:22+5:302017-08-29T00:46:22+5:30
जिल्ह्यातील २५४ गावांनी एकाच सार्वजनिक गणपतीची स्थापना केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गावात सामाजिक सलोखा, एकोपा व कायदा सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने ‘एक गाव, एक गणपती’ बसविण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत जिल्ह्यातील २५४ गावांनी एकाच सार्वजनिक गणपतीची स्थापना केली आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या १५३९ एवढी आहे.
गटातटाच्या राजकारणामुळे काही गावांमध्ये एकापेक्षा अधिक गणपतीची स्थापना करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, यातून अनेकदा वादाचे प्रकार घडतात. एकाच गावात अनेक गणपती मंडळे स्थापन झाल्यावर पोलीस यंत्रणेला बंदोबस्ताच्या दृष्टीने काळजीचा विषय ठरतो. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकांमध्ये ग्रामपंचायत व तंटामुक्त समित्यांना अधिकाधिक गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ स्थापना करण्याच्या आवाहन करण्यात आले होते. अनेक गावांनी स्वत:हून पुढाकार घेत ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. तालुक्यातील जालना, सेवली व मौजपुरी पोलीस ठाण्यांतर्गत सर्वाधिक ५५ गावांनी एका गणपतीची स्थापना केली आहे. भोकरदन व जाफराबाद या तालुक्यांत प्रत्येकी ५० गावांमध्ये एकच सार्वजनिक गणपती स्थापन करण्यात आला आहे.
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा होत असून सुरक्षिततेच्या उपाययोजना जिल्हा पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येत
आहेत.