एकाचे ‘कल्याण’ करून दिल्लीला तर दुसऱ्याचा बिस्मिला करून भोकरदनला पाठवले:अब्दुल सत्तार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:46 AM2024-10-28T11:46:51+5:302024-10-28T11:48:16+5:30

मंत्री तथा सिल्लोडचे शिंदेसेना उमेदवार अब्दुल सत्तार यांची माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर पुन्हा जहरी टीका

One was 'kalyan' to Delhi and the other was sent to Bhokardan with Bismillah: Abdul Sattar | एकाचे ‘कल्याण’ करून दिल्लीला तर दुसऱ्याचा बिस्मिला करून भोकरदनला पाठवले:अब्दुल सत्तार

एकाचे ‘कल्याण’ करून दिल्लीला तर दुसऱ्याचा बिस्मिला करून भोकरदनला पाठवले:अब्दुल सत्तार

सिल्लोड: ‘मी एकाच मतदारसंघात दोन प्रयोग केले. एकाचे कल्याण करून (काँग्रेसचे खा. कल्याण काळे यांना) दिल्लीला पाठवले तर दुसऱ्याचा (भाजपचे माजी खा. रावसाहेब दानवे) बिस्मिला करून त्यांना भोकरदनला पाठवले, अशी टीका पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर नाव न घेता केली.

याबाबतचा एक व्हिडिओ रविवारी दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ८ दिवसांपूर्वी घाटनांद्रा सर्कलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केल्याचे समजते. याबाबत सत्तार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो होऊ शकला नाही; पण हा व्हिडिओ जुना आहे, असा खुलासा सत्तार यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यापासून दानवे व मंत्री सत्तार यांच्यातील राजकीय वाद कमालीचा टोकाला गेला आहे. शिवना येथे अब्दुल सत्तार यांच्या वतीने आयोजित लावणीच्या कार्यक्रमात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या ३९ कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर भाजपाने अजिंठा येथे रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी बोलताना दानवे यांनी सिल्लोडचा पाकिस्तान होतोय, असे वक्तव्य केले होते. याच्या निषेधार्थ सिल्लोडमध्ये सत्तार यांच्या समर्थकांनी आंदोलन केले होते. आताही या दोन्ही नेत्यांमधील वाद टोकाला गेला आहे.

दरम्यान, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुरेश बनकर यांनी उद्धवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना सत्तार यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. बनकर यांना दानवे यांचे पाठबळ असल्याची चर्चा आहे.

Web Title: One was 'kalyan' to Delhi and the other was sent to Bhokardan with Bismillah: Abdul Sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.