एकीचा घरात, दुसरीचा गल्लीत तर तिसरीचा अश्लील छायाचित्र व्हायरल करून विनयभंग
By राम शिनगारे | Published: November 9, 2022 07:44 PM2022-11-09T19:44:57+5:302022-11-09T19:45:14+5:30
औरंगाबाद शहरात विनयभंगाच्या तीन घटना : मुकुंदवाडी, सातारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
औरंगाबाद : एका महिलेच्या मुलीचे लग्न दुसरीकडे करण्यावरून तरुणाने घरात घुसून अश्लील शिवीगाळ केली. दुसऱ्या घटनेत एकाने गल्लीत नग्न होऊन महिलांना शिवीगाळ केली तर तिसऱ्या घटनेत महिलेची अश्लील छायाचित्रे नातेवाइकांमध्ये व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन गुन्हे मुकुंदवाडी तर एक गुन्हा सातारा ठाण्यात नोंदविण्यात आला.
पहिल्या घटनेत मुकुंदवाडीत राहणाऱ्या फिर्यादी महिलेच्या घरी आरोपी अमित लहाने (रा. मुकुंदवाडी) हा मंगळवारी दुपारी गेला. त्याने महिलेस धमकी दिली की, तुम्ही जर तुमच्या मुलीचे लग्न दुसरीकडे केले तर मी तिला मंडपातून उचलून आणेन आणि तिच्या होणाऱ्या पतीसह तुम्हाला जीवे मारेन. महिलेने जाब विचारताच अमितने तिचा विनयभंग केला. दुसरी घटनाही मुकुंदवाडीतच घडली. मंगळवारी रात्री सचिन चाबूकस्वार (रा. तानाजीनगर, रामनगर) हा गल्लीमध्ये आला. त्याने एका महिलेच्या मुलाच्या दुचाकीला मारून खाली पाडत काच फोडली. त्यानंतर रस्त्यावर उभे राहून गल्लीतील महिलांना अश्लील शिव्या देत स्वत: नग्न झाला. या दोन्ही घटनेत मुकुंदवाडी ठाण्यात विनयभंगाचे गुन्हे नोंदविण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर आणि वैशाली गुळवे करीत आहेत.
नातेवाईक महिलेचे छायाचित्र व्हायरल
सातारा ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार नितीन खरात (रा. अंबड, जि. जालना) याने नातेवाईक महिलेला ब्लॅकमेल करीत बळजबरीने नग्न अवस्थेतील व्हाॅट्सॲप कॉल करण्यास भाग पाडले. त्याशिवाय नग्न सेल्फी पाठवायला लावून त्याचे व्हिडीओ कॉलचे स्क्रीनशॉट घेऊन नातेवाइकांना पाठविल्याचा प्रकार ५ नोव्हेंबर २०२० ते ८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान घडला. याप्रकरणी ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक सुरेंद्र माळाळे करीत आहेत.