चाकूचा धाक दाखवून भररस्त्यात एकास लुटले, दोन दात पाडले
By राम शिनगारे | Published: February 15, 2023 09:08 PM2023-02-15T21:08:20+5:302023-02-15T21:08:27+5:30
पावणेदोन लाख रुपये लंपास, दोन आरोपींना बेड्या ठोकल्या
औरंगाबाद : दुचाकीवर आलेल्या चौघांनी एका व्यक्तीस चाकूचा धाक दाखवून लुटून त्यांच्याकडील १ लाख ७५ हजार रुपयांसह दोन बँकांचे एटीएम कार्ड, आधारकार्ड चोरून नेल्याचा प्रकार १२ फेब्रुवारी रोजी रात्री वोखार्ड रोडवरील गजानन हॉटेलच्या समोर नारेगावात घडला. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात लुटमारीचा गुन्हा १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी नोंदविला. त्यानंतर काही वेळातच आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.
कुंडलिक गायकवाड (रा. चिकलठाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १२ फेब्रुवारीच्या रात्री सव्वा दहाच्या सुमारास ते नारेगाव येथे उभे असताना त्यांच्याजवळ एका दुचाकीवरून चार जण आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून गायकवाड यांच्याकडील १ लाख ७५ हजार रुपयांची रोकड लुटली. त्यानंतर त्यांच्या तोंडावर जोराचे ठोसे मारून दात पाडत दोन एटीएम कार्ड लुटून नेले.
गुन्हा नोंदविताच लुटणाऱ्या राहुल संतदान गौतम उर्फ बिहारी (रा. गल्ली नं. १०, मिसारवाडी), सुनील उर्फ सोनू मुरलीधर मगर (रा. गणेशनगर, गारखेडा) या दोघांना बेड्या ठोकल्या. उर्वरित दोन आरोपी फरार आहेत. ही कारवाई निरीक्षक गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन जाधव, अंमलदार अविनाश दाभाडे, दया ओव्हळ, देवीदास काळे, विकी इंगळे, विकी पवार यांच्यासह गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकाने केली.
आरोपींना पोलिस कोठडी
आरोपी राहुल उर्फ बिहारी, सुनील उर्फ सोनू या दोघांना न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केल्याची माहिती निरीक्षक पातारे यांनी दिली.