ज्याने दोन वेळा वाचवले प्राण त्यानेच केला खून; रांजणगावातील खुनाचे रहस्य उलगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 02:39 PM2020-10-24T14:39:03+5:302020-10-24T14:52:53+5:30

रांजणगावातील तरुणाचा मारेकरी पुण्यातून जेरबंद

The one who saved twice took the life; The mystery of the murder in Ranjangaon was revealed | ज्याने दोन वेळा वाचवले प्राण त्यानेच केला खून; रांजणगावातील खुनाचे रहस्य उलगडले

ज्याने दोन वेळा वाचवले प्राण त्यानेच केला खून; रांजणगावातील खुनाचे रहस्य उलगडले

googlenewsNext
ठळक मुद्देमारहाण केल्याने काटा काढल्याची आरोपीची कबुलीआरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शुक्रवारी पहाटे पुण्यातून जेरबंद केले.

वाळूज महानगर : रांजणगावातील भीमराव सावते (३४) याच्या खुनाचे रहस्य उलगडले असून, मुख्य आरोपी कृष्णा ताठे व त्याला फरार होण्यास मदत करणाऱ्या ओमकार कांबळे या दोघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शुक्रवारी पहाटे पुण्यातून जेरबंद केले.

भीमरावने मारहाण केल्यामुळे त्याचा काटा काढल्याची कबुली ताठेने दिल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. भीमराव डिगांबर सावते (३४) याचा मंगळवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला होता.  खून केल्यानंतर कृष्णाने मित्र ओमकार कांबळेसह पुण्यात ओमकारच्या नातेवाईकाकडे आश्रय घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शुक्रवारी पहाटे पुण्यातून कृष्णाला पोलिसांनी जेरबंद केले. 

पोलीस आयुक्तांकडून शाबासकी
पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी शुक्रवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यास भेट दिली. कमी कालावधीत खुनाचा तपास लावल्याबद्दल पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक विजय घेरडे, उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव, राजेंद्र बांगर, सतीश पंडित, पोहेकॉ. कय्युम पठाण, पोकॉ. विनोद परदेशी, दीपक मतलबे, धनेधर आदींचे पोलीस आयुक्तांनी कौतुक करून त्यांना शाबासकी दिली. 

भीमरावचा दोन वेळा जीव वाचवला
भीमरावने दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला कृष्णाने वाचविले होते. मात्र, १८ ऑक्टोबरला भीमरावने मारहाण केल्यामुळे कृष्णा संतप्त झाला होता. पार्टीच्या बहाण्याने भीमरावला बोलावून कृष्णाने त्याचा निर्घृण खून केला. त्यानंतर भीमरावचे चार-पाच मोबाईल व दुचाकी घेऊन पसार झाल्याची कबुली कृष्णाने पोलिसांना दिली. त्याची दुचाकीही पुण्यात विक्री केल्याचे कृष्णाने सांगितले. ही दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. 

अशी उघडकीस आली घटना 
मातोश्रीनगरात एका व्यक्तीचा खून झाल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना बुधवारी सायंकाळी ५ वाजता समजली. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत,  सहा. निरीक्षक विजय घेरडे, उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव आदींच्या पथकाने घटनास्थळी  धाव घेतली. घरातील पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात अर्धनग्न अवस्थेत भीमराव यांचा मृतदेह पडलेला होता. त्यांच्या तोंडावर व शरीरावर धारदार शस्त्राचे वार होते. भिंतीवर रक्ताचे शितोंडे उडालेले होते. खाली रक्ताचा सडा पडलेला होता. खून केल्यानंतर मारेकऱ्याने घराचा मुख्य दरवाजा आतून बंद करून पाठीमागील दरवाजाने पळ काढला. 

 ...अन् पत्नीने घर गाठले  
भीमराव यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असून, त्यांच्याकडे एक ट्रक आहे. या ट्रकवर त्यांनी एक चालक ठेवला आहे. भीमराव, पत्नी वैशाली, मुलगा चेतन (९) व मुलगी स्नेहा (७), असे हे कुटुंब येथे राहते. काही दिवसांपूर्वी पतीशी वाद झाल्याने पत्नी दोन्ही मुलांना घेऊन परभणी जिल्ह्यातील गावी माहेरी निघून गेली होती. मारेकऱ्याने खून केल्यानंतर भीमराव यांच्या मोबाईलवरून घटनास्थळाचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांची पत्नी वैशाली यांच्या मोबाईलवर पाठविले. बुधवारी सकाळी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी नातेवाईकांना सोबत घेऊन रांजणगाव गाठले. तेव्हा खुनाची घटना उघडकीस आली. 

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चोरीचा बनाव
सावते यांचा खून केल्यानंतर मारेकऱ्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून देत चोरीचा बनाव केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. भीमराव हे दलित कोब्रा कामगार युनियनचे  जिल्हाध्यक्ष होते. भीमराव विक्षिप्त स्वभावाचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मंगळवारी रात्री भीमराव यांच्या सोबतच मारेकरी आले असावेत. त्यांनी घरातच ओली पार्टी केल्याचे दिसून आले. पार्टी झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास मारेकऱ्याने नशेत धुंद भीमराव यांच्या चेहऱ्यावर व शरीरावर  हत्याराने वार करून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. 

Web Title: The one who saved twice took the life; The mystery of the murder in Ranjangaon was revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.