एक कर्मचारी छत्रपती संभाजीनगरातील ४५० चौकांमधील वाहतूक कोंडी सोडवू शकतो; पण...
By मुजीब देवणीकर | Published: December 18, 2023 07:00 PM2023-12-18T19:00:00+5:302023-12-18T19:01:19+5:30
स्मार्ट सिटीने लावलेल्या सीसीटीव्ही पोलवरच स्पीकर्स बसविण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटी प्रशासनाने जवळपास १७५ कोटी रुपये खर्च करून शहरात ७५० सीसीटीव्ही, ४५० चौकांमध्ये अत्याधुनिक स्पीकर्स बसविले. मात्र, मागील वर्षभरापासून स्पीकर्सचा अजिबात वापर होत नाही. पोलिस आयुक्तालय, स्मार्ट सिटीच्या कमांड सेंटरमध्ये बसून केवळ एक कर्मचारी सारी वाहतूक कोंडी सोडवू शकतो.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. चारचाकी वाहनधारक, दुचाकीस्वार, रिक्षा चालक रस्त्याच्या कडेला बिनधास्तपणे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. वाहनधारकांना अनावश्यक वाहतूक कोंडीत वेळ घालवावा लागतो. वाहतूक सुरळीत राहावी, शहरातील कायदा सुव्यवस्थेला मदत व्हावी या हेतूने सेफ सिटीअंतर्गत सीसीटीव्ही प्रकल्प चार वर्षांपूर्वी हाती घेण्यात आला. हा प्रकल्प पूर्णही झाला. विविध गुन्ह्यांमध्ये सीसीटीव्ही मोलाची भूमिका बजावत आहेत. मुख्य रस्त्यांवर मंगळसूत्र चोरीच्या घटनाही यामुळेच कमी झाल्या आहेत. स्मार्ट सिटीने शहरात जेथे सीसीटीव्ही बसविले, त्यातील महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ४०० रस्त्यांची निवड करण्यात आली. या ठिकाणी मोठे ४५० स्पीकर्स बसविण्यात आले आहेत. शहरात आणीबाणीची परिस्थिती असेल तर नागरिकांना सूचना देण्यासाठी महागडे स्पीकर्स बसविण्यात आले आहेत.
दोन कमांड सेंटर
सीसीटीव्ही, स्पीकर्स नियंत्रणाचे अधिकार पोलिस आयुक्तालय आणि स्मार्ट सिटीतील कमांड सेंटरला देण्यात आले आहेत. कमांड सेंटरमधून एक कर्मचारी सीसीटीव्ही पाहून रस्त्यात उभी असलेली रिक्षा पटकन काढा, अशी सूचना केल्यानंतर वाहनधारक पटकन वाहन काढून घेतात. अत्यंत प्रभावी असलेली ही यंत्रणा वापरली जात नाही.
पोलिस वापर करतात
पोलिस आयुक्तालयातील कमांड सेंटरमधून सीसीटीव्ही बघून स्पीकर्सवर वारंवार सूचना दिली जाते. एखाद्याने वाहन बाजूला न केल्यास त्याच्या वाहनांच्या नंबरची नोंद केली जाते. जिथे सूचना दिली, त्याची नोंदही एका रजिस्टरमध्ये केली जात आहे.
- फैज अली, प्रोजेक्ट मॅनेजर आयटी, स्मार्ट सिटी.