औरंगाबाद मनपाच्या अजब त-हा; कचरा तुंबल्याचा राग काढला सफाई मजुरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:36 PM2018-06-26T13:36:51+5:302018-06-26T13:40:49+5:30
कचरा न उचलल्याने एका सफाई मजुरावर थेट निलंबनाची कारवाई सोमवारी महापालिका आयुक्तांनी केली. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात असंतोष आहे.
औरंगाबाद : शहरात मागील चार महिन्यांपासून कचरा पडून आहे. जागोजागी कचऱ्याचे मोठमोठे डोंगर साचले आहेत. हजारो मेट्रिक टन कचरा पावसाच्या पाण्याने अक्षरश: सडून दुर्गंधी पसरली आहे. ज्याठिकाणी कचऱ्याच्या पर्वतरांगा उभारण्यात आल्या आहेत, त्या भागातील नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत असतानाही महापालिका प्रशासन काहीच धोरणात्मक निर्णय घेण्यास तयार नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेला कचरा सफाई कर्मचाऱ्यांनी उचलून टाकावा कुठे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कचरा न उचलल्याने एका सफाई मजुरावर थेट निलंबनाची कारवाई सोमवारी महापालिका आयुक्तांनी केली. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात असंतोष आहे.
नारेगाव येथे चार महिन्यांपासून कचरा टाकणे बंद आहे. शहरातील कचऱ्याची स्थिती सफाई मजूर आपल्या पद्धतीने रेटून नेत आहेत. काही वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून कचऱ्यावर प्रक्रियाही करण्यात येत आहे. २,५०० सफाई मजुरांच्या मेहनतीमुळे शहरात अद्याप तरी रोगराई पसरलेली नाही. वेळोवेळी कचरा उचलून ठिकठिकाणी टाकणे, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मदत करणे, आदी कामे मनपाच्या सफाई मजुरांनीच केली. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने घाटी रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा पडून होता. या भागात मनपा आयुक्तY डॉ. निपुण विनायक गेले असता त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. महापालिकेची घंटागाडी येत नाही म्हणून आम्ही कचरा नाईलाजास्तव रोडवर टाकतो, असेही नागरिकांनी सांगितले. त्यावरून या भागातील सफाई मजूर गौतम बबन कांबळे याला सोमवारी निलंबित करण्यात आले.
निरीक्षक, वॉर्ड अधिकाऱ्यांना अभय
मनपा प्रशासनाने कचराप्रश्नी एकट्या सफाई मजुरावर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घाटी रोडवरील जयभीमनगर परिसरात घंटागाडी येत नाही, हे पाहण्याचे काम स्वच्छता निरीक्षकाचे आहे. त्यानेही कर्तव्यात कसूर केल्यास वॉर्ड अधिकारी आहेत. या दोघांना अभय का देण्यात आले. त्यांच्यावरही कारवाई करायला हवी होती, असे मनपातील कामगार संघटनांचे म्हणणे आहे.
एका वॉर्डासाठी तीन रिक्षा
जयभीमनगर घाटी या वॉर्डासाठी मनपा प्रशासनाने तीन रिक्षा दिल्या आहेत. कंत्राटदाराच्या या रिक्षा असून, एका रिक्षाचे भाडे दरमहा २९ हजार रूपये देण्यात येत आहे. तीन रिक्षांचे दरमहा भाडे जवळपास ९० हजार रूपये होते. या भागात कचरा नेणारी रिक्षाच येत नसेल तर त्याला दोषी सफाई मजूर कसा? कंत्राटदार रिक्षा न पाठविता बिल वसूल करतोय का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.