कांदा रोपाचे भाव वधारले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:33 AM2020-12-17T04:33:57+5:302020-12-17T04:33:57+5:30
वैजापूर : जिल्ह्यातील सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी वैजापूर तालुक्यात आहेत. तालुक्यात २ हजार २०० हेक्टर कांदा लागवड झाली आहे. ...
वैजापूर : जिल्ह्यातील सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी वैजापूर तालुक्यात आहेत. तालुक्यात २ हजार २०० हेक्टर कांदा लागवड झाली आहे. परतीच्या पावसाने उन्हाळी कांदा रोपांचे नुकसान झाल्याने उर्वरित कांद्याच्या रोपांना चांगला भाव आला आहे. सध्या कांदा बियाण्याच्या एका पायलीला म्हणजे साडेतीन किलो कांदा रोपाला सात ते आठ हजारांचा भाव मिळू लागला आहे. एका पायलीत साधारणत: पावणे दोन एकरात कांदा लागवड केली जाते.
यावर्षी उन्हाळी कांद्याला चांगल्यापैकी भाव असल्याने शेतकऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात उन्हाळी व रांगडा कांद्याचे बियाणे टाकले होते. कांद्याचे रोप चांगल्यापैकी उगवलेही होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे जे काही कांद्याचे बियाणे टाकले होते. ते अतिवृष्टीने जागीच खराब झाले. जे रोप उरले होते. त्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. अखेर शेतकऱ्यांनी नव्याने पुन्हा नवीन जमीन तयार करून दुबार उन्हाळी व रांगडा कांद्याचे बियाणे टाकले. त्यात अवकाळी व संततधार पावसाने उरलेल्या कांदा रोपांचेही नुकसान झाले. रोपांच्या वाफ्यात पाणी साचल्याने कांद्याची रोपे सडून गेली.
आता उन्हाळी कांद्याने बारा हजार किमतीचा टप्पा पार केला असला तरी आता शेतकऱ्याकडे उन्हाळी कांदा शिल्लक नाही. अगदी बोटांवर मोजता येणाऱ्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. भावही चांगला मिळत आहे. त्यामुळे हे भाव पाहून कांद्याचे रोप मिळेल आणि निदान कांद्याला पुढे चांगला भाव मिळेल. या आशेने शेतकरी कांदा लागवड करीत आहेत. शेतकऱ्यांनी आठ हजार रुपये किमतीने पायलीभर बियाणे विकत घेतली आहेत.
------
नुकसान भरपाईची मागणी
आठ हजार रुपये किंमत देऊन साडेतीन किलो कांदा बियाणे शेतकऱ्यांनी घेतली. लागवड करून कांद्याची रोपटी तयार केली आहेत. एका वाफ्याची किंमत तब्बल अडीच हजार ते तीन हजार रुपयांवर गेली. परंतु तिही मिळत नाही. परंतु त्याचीही किंमत मिळत नाही. या आशेने रोप कोठे मिळते का म्हणून फिरताना दिसून येत आहेत. तर कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव आला आहे. कांदा तोट्यात विकावा लागला असल्याने सरकारने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. उत्पादन खर्चही निघाला नाही. चाळीत साठविलेला कांदा सडला. सरकारने कांद्याबाबतचे धरसोडीचे धोरण शेतकऱ्यांना मारक ठरले. नवीन लागवड करण्याशिवाय पर्यायही नव्हता, अशी प्रतिक्रिया प्रगतशील शेतकरी सीताराम पाटील वैद्य त्यांनी व्यक्त केली.
------
कांदा रोपांचा तुटवडा
कांद्याला जीवनावश्यक वस्तू कायद्यामधून काढण्यात आले. त्यात खानावळी, हॉटेल सुरू होत असून येणाऱ्या काळात कांद्याची वाढती मागणी लक्षात घेता भविष्यात चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकरी सरसावले आहेत. त्यामुळे कांदा रोपांचा तुटवडा जाणवत आहे. तसेच कांदा लागवड परवडत नाही. एकरी पन्नास हजार रूपये खर्च होत असून दर वाढवून राहतील की नाही हा देखील वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. तर काही शेतकरी लागवड करून खर्च करण्यापेक्षा रोपे विकून दोन पैसे मिळवित आहेत.
-------
फोटो -