कांद्याचा वांदा; गडकरींकडे अतिरिक्त रेल्वे रॅक उपलब्ध करण्यासाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 05:30 PM2018-12-31T17:30:30+5:302018-12-31T17:31:48+5:30
नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्न साठवणुकीशी निगडित आहे.
औरंगाबाद : राज्यातील कांद्याचा वांदा होत असल्याने कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कांदा निर्यातीसाठी जास्तीच्या रेल्वे रॅक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातदारांनीदेखील निर्यातीमध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्या.
पाशा पटेल यांनी सांगितले, कांद्याचे दर वीस पैसे किलोपर्यंत घसरल्याने निर्यातीचा टक्का पाचवरून दहापर्यंत नेला. नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्न साठवणुकीशी निगडित आहे. त्यामुळे रेल्वेने कांदा वाहतूक करण्यासाठी जास्तीच्या रॅक (वाघिणी) उपलब्ध करून दिल्या जाव्यात. यासाठी गडकरी यांची भेट घेतली. सध्या दर तीन दिवसांतून एकदा कांद्याची वाहतूक केली जात आहे. नाशिकमधील शेतकरी नगदी पीक म्हणून कांद्याच्या उत्पादनाकडे वळले. यादरम्यान परराज्यातील कांदाही बाजारपेठेत आल्याने दर घसरले. नाशिकमध्ये कांदा साठवुणकीबाबत काही मुद्दे समोर आले असून, निर्यातीसाठी जास्तीचे रॅक उपलब्ध झाल्यास दरांमध्य झालेली घसरण कमी होईल.
द्राक्ष निर्यातदारांची मागणी अशी
नाशिक येथून आलेल्या द्राक्ष निर्यातदार शेतकऱ्यांनी गडकरी यांच्या भेटीनंतर सांगितले, २०१० मध्ये नाशिकमधून निर्यात केलेल्या द्राक्षांची युरोपीय देशांत केलेल्या रासायनिक तपासणीत लिओसीन आढळल्याने तो माल परत पाठविण्यात आला. परदेशात लिओसीन चालत नाही, अशी माहिती निर्यात संस्था ‘आपेडाने’ याबाबत शेतकऱ्यांना दिली नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ती नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी गडकरी यांच्याकडे केली.