विद्यापीठात सव्वादोन लाख विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 12:51 PM2020-11-20T12:51:35+5:302020-11-20T12:53:33+5:30
९० टक्के विद्यार्थ्यांचे प्राधान्य ऑनलाईन प्रवेश शुल्क भरण्याची प्रक्रिया बहुतांश महाविद्यालयांनी वापरली
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्चशिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, तब्बल २ लाख २५ हजार २६१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशास प्राधान्य दिले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी कोरोना संसर्गामुळे महाविद्यालयात येऊ शकतील की नाही, अशी शंका होती. दुसरीकडे, आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयात बोलावणेही संयुक्त नव्हते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल की काय, अशी भीती निर्माण झाली होती. बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष न बोलावता ऑनलाईन प्रवेश अर्ज उपलब्ध करून द्यावेत, तसेच त्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे व संबंधित महाविद्यालयांचे प्रवेश शुल्कही ऑनलाईन भरण्याची सेवा द्यावी, अशा शासनाच्या सूचना होत्या. त्यानुसार ''एमकेसीएल''ने ऑनलाईन प्रवेश सुविधा विनाशुल्क उपलब्ध करून दिली.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या सूचनेनुसार विद्यापीठाशी संलग्न औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद या चारही जिल्ह्यांमधून शहरी आणि ग्रामीण भागामध्ये महाविद्यालय स्तरावर ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. काही महाविद्यालयांत स्थानिक पातळीवर गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला. काही तांत्रिक अडचणी आणि विद्यार्थ्याची माहिती भरण्याचे काम दोन वेळेस करावे लागणार होते. लॉकडाऊनमुळे महाविद्यालयात कर्मचारी उपस्थितीही अगदी नगण्य होती. याची दखल ई-सुविधा प्रणालीमध्ये घेण्यात आली. प्रवेशासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचे संपर्क महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये सहज उपलब्ध असल्याने महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना प्रवेश प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करता आली. एकूण ३६९ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.
प्राचार्य, कर्मचाऱ्यांकडून समाधान
९० टक्के विद्यार्थ्यांचे प्राधान्य ऑनलाईन प्रवेश शुल्क भरण्याची प्रक्रिया बहुतांश महाविद्यालयांनी वापरली असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि ''यूपीआय''च्या माध्यमातून प्रवेश शुल्क ऑनलाईन भरले. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेविषयी विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयापर्यंत जाण्यास लागणाऱ्या प्रवास खर्चामध्ये विद्यार्थी व पालकांची बचत झाली, तसेच रांगेत थांबण्याची गैरसोय दूर झाली आहे. सुमारे ९० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशास प्राधान्य दिले आहे.