विद्यापीठाची ‘आॅनलाईन’ प्रवेश नोंदणी नावालाच

By Admin | Published: July 14, 2015 12:35 AM2015-07-14T00:35:49+5:302015-07-14T00:35:49+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘आॅनलाईन’ प्रवेश नोंदणी प्रक्रिया नावालाच असून, ‘आॅनलाईन’ अर्ज भरल्यानंतरही पुन्हा विभागात

Online admission for the university | विद्यापीठाची ‘आॅनलाईन’ प्रवेश नोंदणी नावालाच

विद्यापीठाची ‘आॅनलाईन’ प्रवेश नोंदणी नावालाच

googlenewsNext


औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘आॅनलाईन’ प्रवेश नोंदणी प्रक्रिया नावालाच असून, ‘आॅनलाईन’ अर्ज भरल्यानंतरही पुन्हा विभागात जाऊन ‘आॅफलाईन’ अर्ज दाखल करावाच लागतो. या प्रकाराचा विद्यार्थ्यांना विनाकारण भुर्दंड आणि मनस्ताप होत आहे.
विद्यापीठाने मागील काही वर्षांपासून सर्वच विभागात प्रवेशासाठी ‘आॅनलाईन’ प्रक्रियेचा अवलंब केला आहे. विद्यार्थ्याने आपल्या शहरातून विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन हव्या त्या अभ्यासक्रमासाठी नावनोंदणी करावी. केवळ प्रवेश नोंदणीसाठी त्याला विद्यापीठात येण्याची गरज नाही. मात्र, असे होताना दिसत नाही. ‘आॅनलाईन’ प्रवेशासाठी विद्यापीठाने नियुक्त केलेल्या महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्याने त्या अर्जाची प्रत घ्यावी व ती प्रत घेऊन विद्यार्थ्याला पुन्हा विद्यापीठात येऊन आवश्यक कागदपत्रे जोडून विभागात सादर करावी लागते. उस्मानाबादच्या विद्यार्थ्याने जरी ‘आॅनलाईन’ प्रवेश नोंदणी केली असली तरी त्याला पुन्हा अर्जाची प्रत घेऊन विद्यापीठात यावेच लागते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेट कॅफेमध्ये जाऊन ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करणे, नंतर त्या अर्जाची ‘प्रिंट’ काढून ती पुन्हा विद्यापीठात येऊन विभागात जमा करणे, या प्रकारामुळे मनस्तापच होत आहे. शिवाय ‘नेट कॅफे’मध्येही काही रक्कम द्यावीच लागते. हा विद्यार्थ्यांना विनाकारण भुर्दंड बसतो. विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेसाठी ‘आॅनलाईन’चा वापर सुरू केला असला तरी तांत्रिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना त्याचा कोणताच फायदा होत नाही. त्या विद्यार्थ्याला विद्यापीठाचा अधिकृत नोंदणी क्रमांक मिळण्यापेक्षा त्याचा कोणताच फायदा नाही.
बँकेशी करार नाही
राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (‘नेट’साठी) ‘आॅनलाईन’ प्रवेश नोंदणी करताना संबंधित वेबसाईटवर विद्यार्थी ‘आॅनलाईन’ अर्ज करतानाच त्याचे फी भरण्यासाठीचे ‘चालान’ तयार होते. त्याची प्रिंट घेऊन विद्यार्थी तेवढे पैसे त्या परीक्षेसाठी प्राधिकृत केलेल्या बँकेत भरतात. नंतर आवश्यक ती कागदपत्रे जोडून प्राधिकृत संस्थेकडे अर्ज पाठवून देतात.
या प्रकारात विद्यार्थ्याला गाव किंवा शहर सोडण्याची गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मात्र अशा प्रकारे कोणत्याही बँकेशी करार न केल्याने विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ फी भरता येत नाही. त्यांना फी भरण्यासाठी पुन्हा विद्यापीठातच यावे लागते. या प्रकारामुळे विद्यापीठाच्या ‘आॅनलाईन’ला कोणताच अर्थ राहत नसून ही प्रक्रिया केवळ नावालाच असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहेत.
विद्यापीठातील विज्ञान विभागातील एका प्राध्यापकाने यासंदर्भात सांगितले की, या प्रक्रियेसंदर्भात आम्ही कुलगुरूंकडे तक्रार केली आहे. या ‘आॅनलाईन’ प्रक्रियेला काहीच अर्थ नसल्याने विद्यार्थ्यांना त्याचा काहीच फायदा नाही. मात्र, त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. विद्यापीठ प्रशासनाला ‘आॅनलाईन’ चा अर्थच कळालेला नाही, असे दिसत आहे.
विद्यापीठाच्या ‘आॅनलाईन’ प्रवेश प्रक्रियेला काहीच अर्थ नसून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘आॅनलाईन’ बरोबरच आॅफ लाईन प्रवेश नोंदणीही विद्यापीठाने चालू करावी. विद्यापीठ ‘आॅनलाईन’मध्ये विद्यार्थ्यांची सोय न पाहता कुणाची सोय पाहात आहेत, हेच कळत नाही.
- तुकाराम सराफ, विद्यापीठ प्रमुख, भाविसे

Web Title: Online admission for the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.