शिक्षकांचे खेटे वाचविण्यासाठी आॅनलाईन केंद्र

By Admin | Published: May 7, 2017 12:07 AM2017-05-07T00:07:53+5:302017-05-07T00:09:23+5:30

लातूर : ग्रामीण भागात इंग्रजी शाळांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या घटत चालली आहे़

Online center to save teachers' wards | शिक्षकांचे खेटे वाचविण्यासाठी आॅनलाईन केंद्र

शिक्षकांचे खेटे वाचविण्यासाठी आॅनलाईन केंद्र

googlenewsNext

आशपाक पठाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : ग्रामीण भागात इंग्रजी शाळांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या घटत चालली आहे़ जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी लातूर जिल्हा परिषद विशेष उपक्रम हाती घेणार आहे़ शिवाय, किरकोळ कामासाठी जिल्हा परिषदेला खेटे मारणाऱ्या शिक्षकांची सोय व्हावी, यासाठी आॅनलाईन निवारण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती रामचंद्र तिरूके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
शिक्षणाचा लातूर पॅटर्न राज्यभर नावाजलेला आहे़ मात्र, तो केवळ आकरावी, बारावीत निर्माण झाला आहे़ तोही मोजक्याच महाविद्यालयांमुळे़ प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे हे खरे आव्हान आहे़ जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार २०० शाळा आहेत़ या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्याचा प्रयत्न राहणार आहे़ इथे ना डोनेशन आहे ना कुठले शुल्क भरण्याची गरज़ सर्वसामान्यांची मुले जिल्हा परिषदेत शिक्षण घेतात़ त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत़ खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमध्ये अधिक गुणवत्ता आहे, परंतु मधल्या काळात याकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामीण भागात इंग्रजी शाळांची संख्या वाढत गेली़ शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये किमान २० टक्के प्रवेश वाढतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ यावर्षी विद्यार्थी वाढीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत़
जिल्हा परिषद शिक्षकांच्या गेल्या चार वर्षांपासून पदोन्नत्या रखडल्या होत्या़ त्यामुळे शिक्षकांची ओरड होती़़ पदोन्नती रखडलेल्या १३३ शिक्षकांना पदोन्नती देत मुख्याध्यापकपदाची आॅर्डर हातात दिल्याचे तिरूके म्हणाले़ शासन मान्य शिक्षक संघटनांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक विचार करून प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले जाईल, असे उपाध्यक्ष तिरूके म्हणाले़ शिक्षकांनी गुणवत्ता जोपासत शाळांचा दर्जा सुधारावा, यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले़

Web Title: Online center to save teachers' wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.