चाळिशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी लागणार डाॅक्टरांचे ऑनलाइन प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:02 AM2021-08-19T04:02:26+5:302021-08-19T04:02:26+5:30
सुदृढ असणाऱ्यांनाच लायसन्स : डाॅक्टरांना ऑनलाइन अपलोड करण्यासाठी दिलाय लाॅगिन पासवर्ड ---- योगेश पायघन औरंगाबाद : वयाच्या चाळिशीनंतर वाहन ...
सुदृढ असणाऱ्यांनाच लायसन्स : डाॅक्टरांना ऑनलाइन अपलोड करण्यासाठी दिलाय लाॅगिन पासवर्ड
----
योगेश पायघन
औरंगाबाद : वयाच्या चाळिशीनंतर वाहन परवाना काढण्यासाठी पूर्वीही डाॅक्टरांकडून सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य होते. हे प्रमाणपत्र ऑफलाइन सादर करावे लागत होते. मात्र, आता लायसन्सची प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने एमबीबीएस डाॅक्टरांना लायसन्स काढणाऱ्यांचे प्रमाणपत्र ऑनलाइन अपलोड करावे लागणार आहे.
लायसन्स काढण्यासाठी केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस लायसन्स सेवा सुरू केली. या योजनेअंतर्गत घरबसल्या लर्निंग लायसन्स व आरटीओ संदर्भातील कामे ऑनलाइन करण्यात आली आहेत. चाळिशीनंतर लायसन्स काढण्यासाठी पूर्वी ऑफलाइन लागणारे फिटनेस सर्टीफिकेट आता ऑनलाइन अनिवार्य आहे. त्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून एमबीबीएस डाॅक्टरांना लाॅगिन आणि पासवर्ड दिला जात आहे. या डाॅक्टरांना लायसन्ससाठी अर्ज करणारा उमेदवार सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र ऑनलाइन भरावे लागणार आहे. त्यामुळे चाळिशीनंतर सुदृढ असलेल्यांनाच नवे लायसन्स किंवा नूतनीकरण करून मिळणार आहे.
----
लर्निंग लायसन्स ऑनलाइन
दिवसेंदिवस वाहने आणि वाहनचालकांची संख्या वाढत असल्याने लायसन्स काढणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यात गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे लायसन्स काढण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते.
- तसेच दलालांकडून अतिरिक्त पैसे आकारले जात असल्याची ओरड नेहमीच होत होती. त्यामुळे आरटीओ कार्यालयात ऑनलाइन लर्निंग लायसन्सची सुविधा सुरू करण्यात आली.
- वयाची १६ वर्षे पूर्ण झाल्यावर विना गिअरच्या दुचाकीचे तर १८ वर्षांनंतर व्यक्ती सुदृढ असेपर्यंत लायसन्स ऑनलाइन काढता येत आहे. मात्र, चाळिशीनंतर डाॅक्टरांचे प्रमाणपत्र आता डॉक्टरांना ऑनलाइन भरावे लागणार आहे.
-----
किती वयापर्यंत मिळते लायसन्स?
----
- वाहन चालविण्याचा परवाना घेण्यासाठी १६ ते १८ वर्षे किमान वयाची अट आहे.
- ड्रायव्हिंग लायसन्स काढणे किंवा नूतनीकरण कोणत्याही वयापर्यंत करता येते.
- मात्र, वयाच्या चाळिशीनंतर एमबीबीएस डाॅक्टरांकडून सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र पूर्वी ऑफलाइन, आता ऑनलाइन अनिवार्य करण्यात आले आहे.
----
आरटीओकडून डाॅक्टरांना लाॅगिन पासवर्ड
---
- पूर्वी सर्वच पॅथीचे डाॅक्टर वैद्यकीय प्रमाणपत्र देत असत. ते देण्यातील अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. त्यामुळे ऑनलाइन लायसन्स प्रक्रियेत एमबीबीएस डाॅक्टरांना लाॅगिन पासवर्ड देण्यात येणार आहे.
- एका डाॅक्टरला दिवसातून केवळ २० प्रमाणपत्रे ऑनलाइन भरता येणार आहेत. त्यांनीच ती ऑनलाइन अपलोड करायची असल्याने यातील गैरप्रकार काही अंशी कमी होण्याची शक्यता आहे.
- वयाच्या चाळिशीनंतर पहिल्यांदाच वाहन चालविण्याचा परवाना काढणारे तसेच नूतनीकरण करणाऱ्यांना एमबीबीएस डाॅक्टरांकडून असे प्रमाणपत्र मिळविणे अनिवार्य असेल.
----
जुन्याच कायद्यानुसार चाळिशीनंतर सुदृढतेचे प्रमाणपत्र डाॅक्टरांकडून लायसन्ससाठी लागते. पूर्वी ऑफलाइन प्रमाणपत्र द्यावे लागत होते, आता ऑनलाइन लायसन्ससाठी डाॅक्टरांना लाॅगिन पासवर्ड दिला जात असून, त्यांनीच ते प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद
----