शालेय शुल्क न देणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करणार
By | Published: December 2, 2020 04:04 AM2020-12-02T04:04:28+5:302020-12-02T04:04:28+5:30
गुजरातमधील खासगी शाळांचा निर्णय : पालक संघटना सरकारकडे गाऱ्हाणे मांडणार अहमदाबाद : जूनपासून शालेय शुल्क चुकते न केलेल्या आणि ...
गुजरातमधील खासगी शाळांचा निर्णय : पालक संघटना सरकारकडे गाऱ्हाणे मांडणार
अहमदाबाद : जूनपासून शालेय शुल्क चुकते न केलेल्या आणि लवकर शुल्क देण्यास तयार नसलेल्या पालकांच्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद करण्याचा निर्णय गुजरातमधील १५ हजार खासगी शाळांच्या संघटनेने घेतला आहे.
गुजरात स्वयंअनुदानित शालेय व्यवस्थापन संघटनेचे उपाध्यक्ष जतिन भराड यांनी सांगितले की, मुलांच्या शिक्षणाबाबत गंभीर असलेल्या पालकांनी शालेय व्यवस्थापनाची भेट घ्यावी. गेल्या सहा महिन्यापासून शालेय शुल्क न देणाऱ्या आणि भविष्यातही न देणाऱ्या पालकांच्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद करण्याचा निर्णय खासगी शाळांनी घेतला आहे. १५ डिसेंबरपर्यंत या पालकांनी शालेय व्यवस्थापनाची भेट न घेतल्यास त्यांच्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद केले जाईल, असे भराड यांनी सोमवारी राजकोट येथे स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या ठरावानुसार सध्या शुल्क देऊ न शकणाऱ्या पालकांनी शालेय व्यवस्थापनाला कळविणे जरुरी आहे. तथापि, असे काही पालक आहेत की, ज्यांनी व्यक्तिश: शालेय व्यवस्थपानाची भेट घेतलेली नाही तसेच शाळेकडून आलेल्या फोनला प्रतिसादही दिलेला नाही.
शाळा पालकांना सक्ती करू शकत नाहीत...
खासगी शाळांच्या या निर्णयाला अखिल भारतीय पालक संघटनेने विरोध केला आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने सरकारला याप्रकरणी हस्तक्षेप करण्यासाठी साकडे घातले जाईल. शुल्क अदा करण्यासाठी शाळा पालकांना सक्ती करू शकत नाही. विशेषत: कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे लोकांना आर्थिक फटका बसलेला असताना अशी सक्ती करू शकत नाही. हा मुलांवर अन्याय आहे, असे संघटनेचे अध्यक्ष नरेश शहा यांनी म्हटले आहे.
अशी केली नंतर सारवासारव
यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर भराड यांनी स्पष्ट केले की, शुल्क भरा म्हणून आम्ही पालकांना सांगत नाहीत. थकीत शुल्काबाबत ज्या पालकांनी शालेय व्यवस्थापनाची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले आहे, अशा पालकांच्या मुलांवर या निर्णयाचा परिणाम होणार नाही. अशा मुलांना ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहण्यास परवानगी दिलेली आहे. शुल्क न दिलेल्या किंवा भविष्यातही देण्याची तयारी नसलेल्या ५ ते ७ टक्के पालकांसाठी हा निर्णय लागू असेल. काही पालकांनी वर्षभराचे शुल्क भरणार नसल्याचे सांगितले आहे. अशा पालकांसाठी हा निर्णय आहे, असे भराड म्हणाले.
........
दहशतवाद विभागापुढील मोठे आव्हान
शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत भारत :
नवी दिल्ली : दहशतवाद हे विभागापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. या धोक्याचा खात्मा केल्यास विभागाच्या वास्तविक आर्थिक क्षमतेला मूर्तरूप देण्यास मदत होईल, असे प्रतिपादन भारताने शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शासनप्रमुखांच्या ऑनलाईन परिषदेत केले.
भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी या परिषदेत बोलताना सीमापार दहशतवादाचा उल्लेख केला. सर्वांनी मिळून या धोक्याचा मुकाबला करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सरकारी धोरणाचे साधन म्हणून दहशतवादाचा वापर करणाऱ्या देशांबाबत आम्ही चिंतित आहोत. आमच्यासमोर सर्वात महत्त्वाचे आव्हान दहशतवाद, विशेषत: सीमापार दहशतवादाचे आहे, असे त्यांनी पाकिस्तानच्या संदर्भाने सांगितले.
भारताला २०१७ मध्ये या संघटनेचे पूर्णकालीन सदस्यत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच या बैठकीचे यजमानपद भूषवत आहे.
पाकिस्तानच्या अन्य एक संदर्भाने नायडू म्हणाले की, दुर्दैवाने एससीओत जाणीवपूर्वक द्विपक्षीय मुद्दे उपस्थित करण्याचे प्रयत्न झाले. हा प्रकार संघटनेच्या तत्त्वांचे आणि मापदंडाचे उल्लंघन आहे.
सप्टेंबरच्या मध्यात एसीओ सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत चुकीच्या पद्धतीने काश्मीर चित्रित केलेला नकाशा पाकिस्तानने सादर केल्याने भारताचे अजित डोवाल या बैठकीतून बाहेर पडले होते. भारताने यावरून पाकिस्तानवर टीकाही केली होती.
........
दिएगो मॅराडोना यांच्या डॉक्टरची पोलिसांकडून चौकशी सुरू
चुकीचे उपचार केल्याचा संशय; घरावर घातला छापा
सॅन इसिद्रो : जगद्विख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे का, याचा तपास करण्यासाठी अर्जेंटिनाच्या पोलिसांनी मॅराडोना यांचे डॉक्टर लिओपोल्डो लुक्यू यांचे रुग्णालय व घरावर रविवारी छापा घातला.
लुक्यू यांच्या घरामध्ये मॅराडोना यांच्यावरील उपचारासंदर्भात आणखी काही कागदपत्रे किंवा पुराव्यांचा पोलिसांनी शोध घेतला. दिएगो मॅराडोना यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मॅराडोना यांच्यावर चुकीचे उपचार करण्यात आले असा आरोप त्यांच्या तीन मुली दाल्मा, गिनिन्ना, जॅना यांनी केला होता. त्यामुळे अर्जेंटिनामध्ये खळबळ माजली होती. ब्युनोस आयर्स या शहरातील तिग्रे भागातील निवासस्थानी दिएगो मॅराडोना यांचे निधन झाले होते. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, मॅराडोना यांच्यावर डॉक्टर लिओपोल्डो लुक्यू यांनी चुकीचे उपचार केले होते का, याबद्दल आम्ही पुढील तपास करीत आहोत. याप्रकरणी मॅराडोना यांच्या कुटुंबीयांचेही जबाब नोंदविण्यात येणार आहेत.
(वृत्तसंस्था)
-----
डॉक्टरचा प्रतिक्रिया देण्यास नकार
अर्जेंटिना पोलिसांनी घरावर छापा घातल्याच्या घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास मॅराडोना यांचे डॉक्टर लिओपोल्डो लुक्यू यांनी नकार दिला. मेंदूत रक्ताची झालेली गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेनंतर मॅराडोना यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत काढलेले छायाचित्र डॉ. लिओपोल्डो लुक्यू यांनी समाजमाध्यमांवरील आपल्या अकाऊंटवर झळकविले आहे.
------------------
हरयाणाचे पशुधन विकास मंडळाचे
अध्यक्ष सांगवान यांचा राजीनामा
------------------------
बलवंत तक्षक
चंदीगड : हरयाणाचे पशुधन विकास मंडळाचे अध्यक्ष सोमवीरसिंह सांगवान यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोमवारी पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी राजीनामा मंजूर करण्याचा आग्रह केला. सांगवान म्हणाले की, जोपर्यंत आंदोलन चालेल तोपर्यंत मी शेतकऱ्यांसोबत दिल्ली-हरयाणा सीमेवर ठामपणे उभा राहीन.
खाप-पंचायतींच्या रोहतकमध्ये झालेल्या बैठकीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सांगवान यांनी अध्यक्षपद सोडण्याचे ठरविले. ते हरयाणात सांगवान खापचे प्रमुख आहेत.
सांगवान यांच्या म्हणण्यानुसार त्यांना अध्यक्षपदाचा लोभ नाही. आंदोलन संपल्यानंतर जर त्यांना पुन्हा अध्यक्षपद सांभाळण्यास सांगण्यात आले तरीही ते पद स्वीकारणार नाहीत.
सांगवान चरखी दादरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले आहेत. ते म्हणाले, मी आधी शेतकरी आणि नंतर आमदार आहे. शेतकऱ्यांना भीती आहे की, नव्या कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किमतीवर शेतीमाल खरेदी बंद होऊ शकते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी लगेच चर्चा करून त्यांचा विश्वास मिळविला पाहिजे. कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय शेतकरी समाधानी होणार नाहीत.
------------------
येत्या काही महिन्यात भारतीयांना मिळणार सुरक्षित, प्रभावी कोरोना लस
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन; ८८ लाख लोक झाले बरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : येत्या काही महिन्यात भारतीयांसाठी अत्यंत सुरक्षित, प्रभावी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. ते म्हणाले, येत्या जून-जुलै महिन्यापर्यंत भारतातील ३० कोटी नागरिकांना कोरोना लस टोचली जाणार आहे.
देशात सोमवारी कोरोनाचे ३८,७७२ नवे रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या ९४,३१,६९१ झाली आहे. एका दिवसात ४० हजाराहून कमी रुग्ण आढळण्याची घटना गेल्या महिनाभरात सातवेळा घडली आहे. या संसर्गातून बरे झालेल्यांचा आकडा ८८,४७,६०० झाला असून, त्यांचे प्रमाण ९३.८१ टक्के झाले आहे. सोमवारी आणखी ४४३ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,३७,१३९ झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात ४,४६,९५२ सक्रिय रुग्ण आहेत.
जगभरात कोरोनाचे ६ कोटी ३१ लाख रुग्ण असून, त्यातील ४ लाख ३५ हजार जण बरे झाले. अमेरिकेत कोरोना रुग्णांचा आकडा १ कोटी ३७ लाख झाला असून, त्यातील ८१ लाख लोक बरे झाले.
------------
महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये सक्रिय रुग्णात घट
महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या पाच राज्यांमध्ये गेल्या महिनाभरात सक्रिय रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. देशात कोरोना चाचण्यांनी १४ कोटींचा पल्ला पार केला आहे.
------------------------