विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात आजपासून ऑनलाईन शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 07:31 PM2020-08-03T19:31:03+5:302020-08-03T19:33:30+5:30
राज्य शासनाने १ आॅगस्टपासून महाविद्यालयांमध्ये आॅनलाईन शिक्षण सुरू करण्याचे आदेश दिले होते.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात ऑनलाईन अध्यापन आणि अध्ययनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार ऑनलाईन शिक्षणाची अंमलबाजवणी करण्याविषयी विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने पत्र काढले आहे. यात प्रत्यक्ष वर्गात शिकविण्याऐवजी ऑनलाईन अध्यापन करण्याच्या सूचनांचा समावेश असल्याची माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली.
राज्य शासनाने १ आॅगस्टपासून महाविद्यालयांमध्ये आॅनलाईन शिक्षण सुरू करण्याचे आदेश दिले होते. यानुसार उच्चशिक्षण विभागाने महाविद्यालय आणि विद्यापीठ प्रशासनला सूचना देत आॅनलाईन शिक्षण देण्याची तयारी करण्याचे आदेश दिले होते. विद्यापीठ प्रशासनाने बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तात्काळ प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी परिपत्रक काढले होते. त्यानंतर १ आॅगस्टपासून आॅनलाईन शिक्षण सुरू होणार असल्याचेही स्पष्ट केले. मात्र, बकरी ईद, रविवार आल्यामुळे आॅनलाईन शिक्षणाची सुरुवात सोमवारपासून सुरुवात होणार आहे. यासाठी सुटीच्या दिवशी परिपत्रक काढले आहे.
शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यापूर्वीच विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्राध्यापकांना महाविद्यालयात बोलावण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यावर प्राध्यापक संघटनांच्या सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर विद्यापीठ प्रशासनानेच आॅनलाईन शिक्षण, प्राध्यापकांच्या उपस्थितीविषयी आदेश देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार प्राध्यापकांना घरातूनच आॅनलाईन अध्यापन करावे लागणार आहे. यासाठी प्राध्यापकांनी व्हिडिओ, आॅडिओसह पीडीएफ तयार केल्या आहेत. हे तयार केलेले साहित्य व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करून त्यातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याविषयीच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. शालेय शिक्षण आॅनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले आहे. यात काही प्रमाणात अडचणी येत असताना काही ठिकाणी सुरळीतपणे आॅनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. त्याची पुनरावृत्ती महाविद्यालयात होणार आहे.
ग्रामीण भागात अडचणींचा डोंगर
ग्रामीण भागातील महाविद्यालयांत पूर्वीपासूनच विद्यार्थ्यांच्या उपस्थिताचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. यात आता आॅनलाईन शिक्षण असल्यामुळे तर येणारे विद्यार्थीही असणार नाहीत. याचा परिणाम दीर्घकालीन होणार आहे. याचवेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटच्याही समस्या उद्भवणार आहेत. त्या सोडविण्यासाठी अद्याप कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याची माहिती समोर आली आहे.