लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन परीक्षा, छोटीशीही चूक पडेल महागात, काय काळजी घ्याल?
By संतोष हिरेमठ | Published: January 23, 2024 04:26 PM2024-01-23T16:26:31+5:302024-01-23T16:26:44+5:30
राज्यभरात १४ जून २०२१ रोजी लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन चाचणी देण्याची सुविधा सुरू झाली.
छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात न जाताही आता अगदी घरी बसल्या बसल्या ऑनलाइन परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स मिळविता येत आहे. त्यामुळे अनेक कटकटींपासून उमेदवारांची सुटका झाली आहे. परंतु ऑनलाइन परीक्षा देताना इकडे तिकडे पाहिले तर निकाल राखीव ठेवला जातो. पुन्हा अर्ज करून परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे ही परीक्षा देताना थोडी काळजी घेतलेली बरी.
राज्यभरात १४ जून २०२१ रोजी लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन चाचणी देण्याची सुविधा सुरू झाली. परंतु नियमांना फाटा देत पैसे उकळून लर्निंग लायसन्स देण्याचा उद्योग काही जणांनी सुरू केला होता. हा प्रकार ‘लोकमत’ने ‘कागदपत्रे व्हाॅट्सॲप करा अन् लायसन्स मिळवा’, ‘८०० रुपये द्या, लगेच लायसन्स घ्या’, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून समोर आणला. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन परिवहन विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर लर्निंग लायसन्ससाठी करण्याचा निर्णय घेतला आणि आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ पद्धतीने विविध सेवा देण्यास सुरुवात झाली.
लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन परीक्षा
लर्निंग लायसन्सच्या परीक्षेसाठी वेब कॅमेरा सुरू केल्यानंतर आधार कार्डवरील उमेदवाराला ओळखूनच चाचणी सुरू होते. चेहऱ्याची मूळ ठेवण जुळल्यानंतरच चाचणी देता येते. त्यामुळे डमी उमेदवाराला परीक्षा देता येत नाही.
दररोज अनेक जण देतात परीक्षा
काही दिवसांपासून अगदी घरी बसून परीक्षा देता येत असल्याने ऑनलाइन चाचणी देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आरटीओ कार्यालयात न येता सहजपणे लर्निंग लायसन्स मिळते.
नापास होण्याची कारणे काय?
घर बसल्या ऑनलाइन परीक्षा देताना इकडे तिकडे पाहिल्यास, म्हणजे स्क्रीनवरून नजर हटल्यास, परीक्षा देणाऱ्याच्या पाठीमागून इतर कोणी गेल्यास निकालच जाहीर केला जात नाही. त्यामुळे पुन्हा परीक्षा द्यावी लागते. वाहतूक नियमांचा अभ्यास नसेल तरीही उमेदवार नापास होतात.
ऑनलाइन परीक्षेसाठी...
सारथी परिवहन संकेतस्थळावरून लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज करून, विहित शुल्क भरून परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स मिळविता येते. १५ प्रश्नांपैकी किमान ९ प्रश्नांची उत्तरे बरोबर असावीत.
परीक्षा देताना काय काळजी घ्याल?
आधार कार्डवरील फोटो अपडेट करून घ्यावा. चेहरा जुळला नाही तर परीक्षा देता येत नाही. परीक्षेदरम्यान इकडे तिकडे पाहू नये. मागून कोणी जाणार नाही, याची काळजी घ्यावी.