पार्टटाइम जॉबच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीचा फंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:04 AM2021-05-26T04:04:46+5:302021-05-26T04:04:46+5:30
ऑनलाइन फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार विविध फंडे वापरून सामान्यांना जाळ्यात ओढत असतात. शेतात अथवा भूखंडावर मोबाइल कंपनीचे टॉवर बसवून ...
ऑनलाइन फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार विविध फंडे वापरून सामान्यांना जाळ्यात ओढत असतात. शेतात अथवा भूखंडावर मोबाइल कंपनीचे टॉवर बसवून ७५ हजार रुपये महिना भाडे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे नोंद आहेत. आता घरबसल्या पार्टटाइम काम करा आणि दरमहा १५ ते ५० हजार रुपये वेतन मिळवा, अशी जाहिरात करून सायबर गुन्हेगार बेरोजगारांना जाळ्यात ओढत असल्याचे समोर आले. पार्टटाइम काम करण्यासाठी कंपनीकडून दीड लाखाचा लॅपटॉप दिला जाणार असल्याचे सांगत मोठी रक्कम त्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन भरण्यास सांगितली जाते. यासोबतच बनावट नियुक्तीपत्र पाठवून विश्वास संपादन करून भामटे करार करण्याच्या नावाखाली पैसे उकळतात. काही प्रकरणांत काम मागणारा स्वतःचा लॅपटॉप आहे, त्याचा वापर करतो, असे सांगतो. तेव्हा त्याला कंपनीच्या धोरणानुसार आमचाच लॅपटॉप वापरणे बंधनकारक असल्याचे सांगितले जाते. मोठ्या पगाराची नोकरी मिळत असल्याचे पाहून पैसे भरतात. यामुळे त्यांची फसवणूक होते. यासोबतच काम करून घेतल्या जाते आणि कामात त्रुटी राहिल्याचे सांगून कंपनीच्या नियमाचे भंग केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करण्याची ऑनलाइन धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रकार सायबर गुन्हेगारांकडून होत आहेत, अशी एक तक्रार नुकतीच सायबर पोलीस ठाण्याला प्राप्त झाली.
कोट
अनोळखी व्यक्तीसोबत ऑनलाइन आर्थिक व्यवहार करू नका. नोकरीच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार विविध समाजमाध्यमांवर लिंक शेअर करून प्रलोभन दाखवितात. काही गुन्हेगार वर्तमानपत्रांत जाहिराती देऊन ऑनलाइन फसवणूक करतात. अशा कोणत्याही जाहिरातीची खात्री केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नका.
- गीता बागवडे, पोलीस निरीक्षक, सायबर ठाणे