ऑनलाईन शिक्षण : शिकणे आणि शिकविण्यातील मजाच निघून गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 07:25 PM2020-07-29T19:25:27+5:302020-07-29T19:27:32+5:30
कोविड-१९ चे संकट गंभीर असल्यामुळे दुसरा कोणताही प्रभावी पर्याय उपलब्ध नसल्याचेही पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
- राम शिनगारे
औरंगाबाद : सध्या आॅनलाईन शिक्षणाचे धडे सर्वांनाच मिळू लागले आहेत. मात्र, या पद्धतीत विद्यार्थी आणि शिक्षकांत संवादच होत नसल्यामुळे अध्ययन-अध्यापनात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. या व्यवस्थेत शिक्षकांनी केलेले अध्यापन विद्यार्थ्यांना समजते की नाही, याचा उलगडा होत नसून, हे अध्ययन आणि अध्यापन हे रटाळवाणे, कंटाळवाणे होत असल्याची बाब समोर येत आहे. शहरात पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून आॅनलाईन अध्यापन करण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना पालकांनी मोबाईल, टॅब व संगणक पुरविले आहेत. या नव्या शिक्षण पद्धतीविषयी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला असता, अनेक बाबी समोर आल्या आहेत. मात्र कोविड-१९ चे संकट गंभीर असल्यामुळे दुसरा कोणताही प्रभावी पर्याय उपलब्ध नसल्याचेही पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जगभरात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. भारतासह राज्यातील शाळा १६ मार्च २०२० पासून बंद आहेत. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातही १ जूनपासून आॅनलाईन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. यात पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याविरोधात मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठात दाखल याचिकेनंतर राज्य शासनाने ही बंदी उठवली आहे. या बंदीच्या अगोदर आणि नंतरही आॅनलाईन शिक्षण सुरूच आहे. याविषयी ‘लोकमत’ने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधत येणाऱ्या अडचणी, बलस्थाने जाणून घेतली आहेत. यात वर्ग अध्यापनासारखे प्रभावी शिक्षण मिळत नसल्याची खंत सर्वांनीच व्यक्त केली. अल्पकालावधीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून आॅनलाईन शिक्षण परवडणारे आहे. मात्र, दीर्घकालावधीसाठी हे शिक्षण परवडणारे आहे, असे स्पष्ट मतही शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केले.
सकारात्मक बाजू :
01. कोविड-१९ चा कोणताही धोका न पत्करता विद्यार्थी शिक्षकांशी आॅनलाईन संवाद साधू लागले.
02. मुलगा आॅनलाईन अध्ययन करीत आहे की नाही, यावर पालकांना लक्ष ठेवणे सोपे झाले.
03. मोबाईलवर गेम खेळणे, टीव्ही पाहण्याऐवजी मुले आॅनलाईन अध्ययनात व्यस्त झाली.
04. पूर्वी सहा तास शाळा, त्याला जाण्यासाठी आणि येण्यासाठी दोन तास तयारी, घरी आल्यावर पुन्हा क्लासेस, यात जाणारा वेळ आॅनलाईनमुळे कमी झाला. अनेक मुले घरासमोरील मोकळ्या जागा, सोसायट्यांच्या रिकाम्या जागेत अधिक काळ खेळू लागली.
05. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात त्याविषयी गोडी निर्माण होऊ लागली आहे. यूट्यूबसह इतर यंत्रणांचा अचूकपणे वापर करता येऊ लागला आहे.
नकारात्मक बाजू :
01. मोबाईल, टॅब किंवा संगणकासमोर अधिक काळ बसल्यामुळे डोळे, कानाचे आजार उद्भवू शकतात.
02. १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे व्हॉटसअॅप ग्रुप तयार केल्यामुळे विशेषत: मुलींचे नंबर सार्वजनिक होत आहेत. यातून काही गैरप्रकारही घडू लागले आहेत.
03. विद्यार्थी व शिक्षकांचा संवाद नसल्यामुळे सर्वांगीण विकासात अडथळा निर्माण होत आहे.
04. पूर्वी ४५ मिनिटांच्या तासात शिक्षक अनेक उदाहरणे देऊन अध्यापन करीत असत. विविध उदाहरणे देता येत असत. विद्यार्थ्यांना हसवता येत होते. व्हिडिओमुळे शिक्षक काटेकोरपणे केवळ विषयावरच बोलत आहेत. त्यामुळे रटाळपणा वाढला.
05. विद्यार्थी अधिक काळ आॅनलाईन राहत असल्यामुळे अध्यापनाशिवाय इतर बाबी पाहू लागलेत. पालकांची नजर चुकवून इतर विंडो उघडत आहेत.
06. ग्रामीण भागासह शहरातील अनेक भागांत इंटरनेटची समस्या असल्यामुळे व्हिडिओ डाऊनलोड, आॅनलाईन लिंक ओपन होत नाहीत, तसेच अनेक गरीब पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल, टॅब आणि संगणक यापैकी कोणतेही साधन नसल्यामुळे मुलांच्या मनात न्यूनगंड तयार होत आहे.
07. वर्गमित्रांशी भेट होत नसल्यामुळे विद्यार्थी एकलकोंडे होण्याची भीती, तसेच घरात सतत पालकांच्या लक्ष देण्यामुळे मुलांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.
बोर्डावर शिकवलेले डोक्यात जाते, आॅनलाईनचे नाही
शाळेत बोर्डावर शिक्षकांनी शिकवलेले तात्काळ डोक्यात जाते, समजतेही; पण आॅनलाईन शिकताना तितक्या लवकर समजत नाही. डोक्यावरून जाते. सध्या चार तास शाळेचे आॅनलाईन शिक्षण मिळत आहे. त्याशिवाय दोन तास क्लासेसचे आॅनलाईन शिक्षण मिळते. एकूण सहा-सात तास आॅनलाईन शिकवले जाते. आॅनलाईन शिकताना सतत नेट डिस्कनेक्ट होते. त्यामुळे आवाज येत नाही. अनेक जण व्हिडिओ आॅफ करून बसतात. तेव्हा ते आॅनलाईन असतात की, नाही हे समजत नाही. जास्त वेळ आॅनलाईन बसल्यास बोअर होते. बोअर झाल्यास शिकण्यात मन लागत नाही. याशिवाय वर्गात फळ्यावर लिहून देत असत. नोटबुक तपासले जात होते. आॅनलाईनमध्ये शिक्षक पीपीटी तयार करून देतात. त्यामुळे आम्ही लिहून घेत नाहीत. याचा परिणाम लिहिणे कमी झाले आहे. फ्रेंड सर्कलची भेट होत नाही. तरीही या कोरोनाच्या काळात आॅनलाईनशिवाय पर्याय उपलब्ध नाही. - प्रवण जाधव, दहावीचा विद्यार्थी.
मुलांची मानसिक तयारी करावी लागते
माझा मुलगा नववीमध्ये आहे. त्याचे आॅनलाईन शिक्षण सुरू आहे. दररोज सकाळी मुलांची आॅनलाईन अध्ययनासाठी मानसिक तयारी करावी लागते. रेंजची समस्या सतत येते. अभ्यास पाठवायचा असेल तर पाठवता येत नाही. पालकांना अधिक लक्ष द्यावे लागते. मुलांना जे समजत नाही, ते सांगावे लागते. मुले शिक्षकांना घाबरत असल्यामुळे समजले की नाही ते विचारत नाहीत. त्यामुळे पालकांना अधिक दक्ष राहावे लागत आहे. तरीही सध्याच्या काळात आॅनलाईनला पर्याय नाही. - वर्षा सोनवणे, पालक, वाळूज
आॅनलाईनमधून विषमता निर्माण होऊ नये
कोरोनाच्या संकटात सद्य:स्थितीत आॅनलाईन शिक्षणाला पर्याय नाही. मात्र, वर्ग अध्यापनाला हा पर्याय होऊ शकणार नाही. ग्रामीण भागातील मुलांना आॅनलाईन शिक्षण शक्य नाही. सरकारी शाळांकडे तेवढे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. त्यासाठी दूरदर्शन, आकाशवाणी अशा माध्यमातून समूह पातळीवर आॅनलाईनचा प्रयोग झाला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विषमता निर्माण होणार नाही. तसेच काही तासांचे आॅनलाईन शिक्षणासाठी काही हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यावरही निर्बंध आले पाहिजेत. सरकारचा आॅनलाईन शिक्षणाच्या शुल्कावर कंट्रोल असला पाहिजे.
- डॉ. पुरुषोत्तम देशमुख, पालक
शिकविण्याचे समाधान मिळत नाही
मी ५ वी ते ७ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवतो. अनेक विद्यार्थ्यांना आॅनलाईन लाईव्ह येणे शक्य होत नाही. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी इंटरनेट नसते, कधी चार्जिंग नसते तर कधी वडिलांचा मोबाईल असेल तर ते बाहेर गेलेले असतात. यामुळे शाळा प्रशासनाने व्हिडिओ तयार करून यू-ट्यूूबवर अपलोड करून विद्यार्थ्यांना लिंक देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. या सूचनेनुसार दररोज यू-ट्यूबवर १८ मिनिटांचे व्हिडिओ अपलोड करतो. हे व्हिडिओ विद्यार्थ्यांना सोयीनुसार पाहता येतात. मात्र, विद्यार्थी पाहतात की नाही, याची तपासणी करता येत नाही. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. ७ वी च्या वर्गात ३०० विद्यार्थी आहेत. त्यापैकी केवळ एक ते दोन विद्यार्थ्यांचा अडचण असेल तर फोन येतो. बाकीच्या विद्यार्थ्यांना काहीच अडचणी नाहीत, असेच समजावे लागते. पूर्वी वर्गात ४५ मिनिटांच्या तासात विद्यार्थ्यांचे भाव टिपता येत होते. आता फक्त एकतर्फा संवाद आहे. दुतर्फा नाही. शिकविण्यातही उदाहरणे देता येत नाहीत. मात्र, तरीही आॅनलाईनशिवाय दुसरा पर्यायही नाही. त्यातून काही तरी विद्यार्थ्यांना देता येते एवढेच समाधान आहे.
- विनोद सिनकर, शिक्षक
स्क्रीन टाईम घातक; होतात दीर्घकालीन परिणाम
विद्यार्थ्यांनी शिकण्याच्या चार शैली आहेत. यात बसून, ऐकून, स्पर्श करून आणि कृतीतून शिकण्याचा समावेश आहे. आॅनलाईनमध्ये फक्त बसून शिकणारे आणि ऐकून शिकणाऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, विद्यार्थी अनुभवातून ९० टक्के शिकत असतात. आॅनलाईनमध्ये अनुभव मिळत नाही. माहिती मिळते. १० पर्यंतच्या मुलांचे सामाजीकरण याच कालावधीत होत असते. ते आॅनलाईनमधून होत नाही. हे दीर्घकालीन परिणाम आहेत. याशिवाय आॅनलाईन शिक्षणातील सर्वात घातक प्रकार स्क्रीन टाईम हा आहे. या स्क्रीन टाईममुळे मेंदूतील चेतापेशी डॅमेज होतात. यातून आॅटीजम हा आजार होऊ शकतो. या आजाराने मेंदूत बिघाड होत नाही, मात्र स्वमग्नता येण्याची शक्यता असते. तपासण्या केल्यास दिसत नाही, मात्र लक्षणे तीच असतात. त्यामुळे आॅनलाईन शिक्षण बंद केले तरी काही फरक पडणार नाही. इतर मार्गाने शिकवता येऊ शकते किंवा एक वर्ष वाया जाईल. त्याचा सदुपयोग इतर ठिकाणी करता येईल. मात्र, कायमस्वरूपी आजार होणे परवडणारे नाही.
- डॉ. अपर्णा अष्टपुत्रे, विभागप्रमुख, मानसशास्त्र विभाग, विद्यापीठ