कर्जमाफीची यादी मागणा-या मूर्खांनी आॅनलाईन यादी तपासावी -दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:29 AM2017-10-23T01:29:46+5:302017-10-23T01:29:46+5:30
कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची यादी सरकारला मागणा-या मूर्खांनो, मोबाईलचे बटन दाबा व कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची आॅनलाईन यादी पाहा, अशी जाहीर टीका खा. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अंबड तालुक्यातील जामखेड येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची यादी सरकारला मागणा-या मूर्खांनो, मोबाईलचे बटन दाबा व कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची आॅनलाईन यादी पाहा, अशी जाहीर टीका खा. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अंबड तालुक्यातील जामखेड येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात केली. लोकसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षांचा कालावधी बाकी असताना काही जणांना कावीळ झाल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर जाहीर टीका केली. अंबड तालुक्यातील जामखेड येथे रविवारी सायंकाळी भाजपच्या नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार समारंभात बोलताना खा. दानवे यांनी ही टीका केली. यावेळी भाजपचे आ. नारायण कुचे यांनी शिवसेना हा दलालांचा पक्ष असून कुठेही मॅनेज होणारा पक्ष असल्याने शिवसेनेची आज अशी गत झाल्याची टीका खा. दानवे यांच्या उपस्थितीत केल्याने आगामी काळात भाजपचा क्रमांक एकचा शत्रूपक्ष शिवसेनाच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
केंद्र व राज्यातील भाजप सरकार शेतकºयांच्या हिताशी पूर्णपणे बांधील असून आम्ही केलेली कर्जमाफी ही योग्य शेतक-यांना लाभ मिळवून देणारी खरी कर्जमाफी आहे. पूर्वीच्या सरकारने ६० हजार कोटी रुपयांची जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी होती, या कर्जमाफीमुळे शेतक-यांचा नव्हे तर बुडीत निघणा-या बँकांचा फायदा झाला. आम्ही दिलेल्या कर्जमाफीची रक्कम थेट शेतक-यांच्या खात्यात जमा होणार असून सर्वसामान्य शेतकºयांनाच या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याने विरोधकांबरोबरच मित्रपक्षात पोटशूळ उठला आह, असे दानवे म्हणाले.
आ. नारायण कुचे म्हणाले की, शिवसेना हा दलालांचा पक्ष आहे. शिवसेनेचे नेते सकाळी एक, दुपारी एक तर सायंकाळी एक बोलतात. शिवसेनेचे नेते विकले जात असल्यानेच शिवसेनेची आज दुरवस्था झाली आहे. राज्यातील भाजपा सरकार शेतकरी, कष्टकरी, गरिबांच्या हिताच्या अनेक विकास योजना राबवित आहे. मात्र सत्तेत असलेला मित्रपक्ष विकास कामांमध्ये अडथळा आणण्याचे पाप करत आहे.