आॅनलाईन पीजी सीईटी होणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:53 PM2018-02-10T23:53:36+5:302018-02-10T23:53:36+5:30
अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा विरोध झुगारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आॅनलाईन पदव्युत्तर प्रवेशपूर्व परीक्षा (पीजी-सीईटी) घेणार आहे. कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठातील विभागप्रमुख आणि पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांच्या १०६ महाविद्यालयांतील प्राचार्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत १५ एप्रिल ते १ मे दरम्यान आॅनलाईन पीजी-सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा विरोध झुगारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आॅनलाईन पदव्युत्तर प्रवेशपूर्व परीक्षा (पीजी-सीईटी) घेणार आहे. कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठातील विभागप्रमुख आणि पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांच्या १०६ महाविद्यालयांतील प्राचार्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत १५ एप्रिल ते १ मे दरम्यान आॅनलाईन पीजी-सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे, समाजशास्र विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी हेदखील हजर होते. बैठकीत विषयनिहाय आॅनलाईन सीईटीसाठी कुलगुरूंच्या अध्यक्षेतखाली अधिष्ठाता, विभागप्रमुख आणि प्राचार्यांची संयुक्त समिती तयार करण्यात येणार आहे. यामध्ये दहा प्राचार्य, दहा विभागप्रमुख आणि चार अधिष्ठाता असा २४ जणांचा समावेश असेल. सदस्यांची नावे सोमवारी जाहीर करण्यात येतील. डॉ. सरवदे पीजी-सीईटीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
गेल्या वर्षीप्रमाणे आॅफलाईन पीजी-सीईटी घेण्याऐवजी विद्यापीठाने यंदा पीजी-सीईटी आॅनलाईन पद्धतीने घेण्यावर जोर दिला. सदरील बैठकीत ग्रामीण भागातील महाविद्यालयातील प्राचार्यांनी पीजी-सीईटीला तीव्रपणे विरोध केला. आधीच ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्येचा पदव्युत्तर पदवीतील टक्का घसरत आहे. त्यातही प्रवेशपूर्व परीक्षेमुळे अनेकांनी पाठ फिरवली असल्याची कारणे या प्राचार्यांनी समोर केली.
पदवी परीक्षेनंतर गावी जाणाºया विद्यार्थ्यांना मे-जूनमध्ये पीजी-साईटी देण्यासाठी पुन्हा शहरात येण्यास अतिरिक्त खर्च करावा लागतो. त्यामुळे पीजी-सीईटी ही अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेनंतर लगेच घेण्यात यावी, असा प्रस्ताव मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी मांडला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत १५ एप्रिल ते १ मे दरम्यान विविध विषयांच्या प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच चार जिल्ह्यांमध्ये दहा समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात येतील.
यंदा सामायिक नाही तर विषयनिहाय सीईटी
यंदा सामायिक पदव्युत्तर प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार असून, विषयनिहाय सीईटी घेतली जाणार आहे. २० फेबु्रवारीपासून नोंदणीस प्रारंभ होणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी दोनशे तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी शंभर रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले आहे. केवळ या सीईटीतील गुणांच्या आधारेच पदव्युत्तर पदवीला प्रवेश देण्यात येणार असून, स्पॉट अॅडमिशनसाठी स्वतंत्र नियमावली असेल.