वैद्यकीय महाविद्यालयांत आॅनलाइन हजेरीची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:22 AM2017-11-06T00:22:04+5:302017-11-06T00:22:08+5:30
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) डिजिटल मिशन मोड प्रकल्पांतर्गत सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि शिक्षकांची आॅनलाइन उपस्थिती घेण्याचा निर्णय घेतला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) डिजिटल मिशन मोड प्रकल्पांतर्गत सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि शिक्षकांची आॅनलाइन उपस्थिती घेण्याचा निर्णय घेतला आहे. १ डिसेंबरपासून मूल्यांकन प्रक्रियेत केवळ बायोमेट्रिक प्रणालीवरील उपस्थितीचा विचार केला जाणार आहे.
‘एमसीआय’च्या ३१ आॅक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला आहे. कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे एक प्रकारे वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यातून भारतीय वैद्यकीय शिक्षणाच्या मानांकनात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांत ४ हजार ५०० उपकरणांद्वारे प्राध्यापकांची उपस्थिती प्राप्त केली जाणार आहे.
प्राध्यापकांची बायोमेट्रिकवर उपस्थिती घेण्याचे काम तात्काळ सुरू करावे, अशी सूचना ‘एमसीआय’ने एका पत्राद्वारे सर्व अधिष्ठातांना केली. ‘एमसीआय’ कडून होणाºया मूल्यांकनात १ डिसेंबरपासून हस्तलिखित (मॅन्युअली) उपस्थितीचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही.