निवृत्त पोलीस अधिकाऱ्यास आॅनलाईन गंडा
By Admin | Published: June 2, 2016 01:07 AM2016-06-02T01:07:53+5:302016-06-02T01:21:19+5:30
औरंगाबाद : शहरात आॅनलाईन गंडविण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. शहरातील पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्यास तोतया बँक अधिकाऱ्याने १९ हजार ९०० रुपयांचा आॅनलाईन गंडा घातला.
औरंगाबाद : शहरात आॅनलाईन गंडविण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. शहरातील पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्यास तोतया बँक अधिकाऱ्याने १९ हजार ९०० रुपयांचा आॅनलाईन गंडा घातला. ही घटना ३१ मे रोजी दुपारी घडली.
पोलिसांनी सांगितले की, भोईवाडा येथील रहिवासी सय्यद नियाजअली सय्यद जहूरअली यांना ३१ मे रोजी दुपारी एक फोन आला. फोन करणाऱ्याने भारतीय स्टेट बँकेतून बोलत असल्याचे व ३१ मे रोजी एसबीआयचे एटीएम कार्ड बंद होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कार्डधारक ग्राहकांची माहिती आम्ही जमा करीत असल्याचे नमूद केले. त्याने सय्यद नियाजअली यांच्याकडून त्यांच्या एटीएम कार्डवरील माहिती घेतली. एटीएम कार्डवरील नंबर त्यास त्यांनी सांगितला. त्यानंतर भामट्याने नियाजअली यांच्या बँक खात्यातून परस्पर १९ हजार ९०० रुपये काढून घेतले. याबाबतचा मेसेज त्यांना प्राप्त होताच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
बँक ग्राहकांना फोन करून कोणतीही माहिती विचारत नसते. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारचे येणारे फोन कॉल्स हे बनावट व्यक्ती करीत असतात. त्यांच्याकडून फसवणूकच होते. त्यामुळे कोणासही बँक खाते, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्र्डबाबत माहिती देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.