आॅनलाईन घोटाळा
By Admin | Published: April 23, 2016 11:31 PM2016-04-23T23:31:39+5:302016-04-23T23:58:25+5:30
बीड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मग्रारोहयो) आॅनलाईन घोटाळा झाल्याचे शनिवारी उघड झाले आहे. तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या
बीड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मग्रारोहयो) आॅनलाईन घोटाळा झाल्याचे शनिवारी उघड झाले आहे. तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या कामांत तहसीलच्या आॅपरेटरनेच छेडछाड केली असून, या प्रकरणी त्याच्याविरूद्ध शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुनीत वैद्य असे त्या आॅपरेटरचे नाव आहे. तो तहसील कार्यालयात कार्यरत आहे. मात्र, तहसील कार्यालयात बसून नोंदी करण्याऐवजी तो खासगी नेटकॅफेमध्ये बसत असे. तेथे बसून त्याने आॅनलाईन बोगस कार्यारंभ आदेश, प्रशासकीय मान्यता, मस्टर नोंदी, बोगस वर्ककोड नोंदवल्याचे समोर आले. काही गावांमध्ये बोगस मजूर दाखवून मजुरी देखील हडप केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
दरम्यान, सहा ग्रामपंचायतींमध्ये आॅनलाईन घोटाळा समोर आला असला तरी आणखी काही गावांमध्ये हा गैरप्रकार झाल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. या संदर्भात सीईओ नामदेव ननावरे यांच्या आदेशावरून फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० (६६ सी - ६६ ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या ग्रामपंचायतींच्या कामांत छेडछाड
तालुक्यातील देवी बाभूळगाव, खापरपांगरी, मोरगाव, राजुरी नवगण, उमरद जहाँगीर, तिप्पटवाडी या ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या मग्रारोहयोच्या कामांमधील नोंदीत आॅपरेटर वैद्य याने छेडछाड केल्याचे निष्पन्न झाले आहे. (प्रतिनिधी)४
आॅपरेटर वैद्य हा शिवाजीनगर ठाण्यालगत असलेल्या श्री नेटकॅफेमध्ये संगणकावर मग्रारोहयोच्या कामात आॅनलाईन छेडछाड करीत असल्याच्या माहितीवरून बीड पं. स. चे गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे, सहायक बीडीओ रवींद्र तुरूकमारे, विस्तार अधिकारी कल्याण शेळके, पो. हे. काँ. संजय वडमारे यांनी तेथे छापा टाकला. यावेळी मार्च महिन्यात पाच तर एप्रिल महिन्यात दोन वेळा वैद्य तेथे आल्याचे नेटकॅफेमधील रजिस्टर नोंदीवरून स्पष्ट झाले. तहसीलमध्ये कार्यारत असून, तो पं. स. च्या कामात ढवळाढवळ करायचा. मग्रारोहयो कक्षाचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांच्या अहवालानंतर सीईओंनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.