पुन्हा भरणार ऑनलाईन शाळा, शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 03:13 PM2022-01-05T15:13:19+5:302022-01-05T15:16:33+5:30
Aurangabad Municipal Corporation : ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
औरंगाबाद : कोरोना रुग्णांची ( corona Virus in Aurangabad ) वाढती संख्या आणि ओमायक्रॉनचा प्रभाव या पार्श्वभूमीवर शहरातील पहिली ते आठवीच्या शाळा उद्यापासून ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने ( Aurangabad Municipal Corporation ) घेतला आहे. या काळात शाळा पुन्हा ऑनलाईन पद्धतीने सुरु राहणार आहेत.
शहरात रोज नव्या भागात रुग्णांचे निदान होत आहे. शिवाय ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. शहरात काही दिवसांपूर्वी दोन ओमायक्रॉन बाधीत आढळून आले होते. ते उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, आता शहरात कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढत आहे. मंगळवारी तर तब्बल १०३ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. शहराचा पॉझीटीव्हीटी रेट सुद्धा वाढत जात आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपया म्हणून शहरातील पहिले ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय उद्या गुरुवार ( दि. ६ जानेवारी ) पासून अंमलात येणार आहे. शाळा बंद झाल्यानंतर पुन्हा ऑनलाईन अध्ययन सुरु करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. तसेच वेळोवेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील अशी माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
नववी ते बारावी सुरु राहणार
या काळात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा-महाविद्यालये सुरु राहणार आहेत. तसेच दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सुरु राहतील.
असा वाढला पाॅझिटिव्हिटी रेट
शहरात २७ डिसेंबर पाॅझिटिव्हिटी रेट ०.१६ टक्के होता. या दिवशी शहरात ४ रुग्णांची वाढ झाली होती. आठ दिवसांत शहरातील नव्या रुग्णांची संख्या ४ वरून सोमवारी २९ वर गेली. पाॅझिटिव्हिटी रेट १.२१ टक्के राहिला.
अशी वाढतेय रुग्णसंख्या
तारीख - ग्रामीण-शहर
२७ डिसेंबर - ०-४
२८ डिसेंबर - ०-९
२९ डिसेंबर - १-१५
३० डिसेंबर - २-१४
३१ डिसेंबर - ४-१४
१ जानेवारी - १०-१६
२ जानेवारी- ७-२८
३ जानेवारी-८-२९
४ जानेवारी - ८७- १६