दिवाळीमुळे आॅनलाईन सर्व्हर ओव्हरलोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:10 AM2018-11-07T00:10:04+5:302018-11-07T00:11:02+5:30
दिवाळीच्या तोंडावर तरी बँकांमध्ये ‘रोख’ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे होते; मात्र बाजारात नोटांचा तुटवडा असण्यास ८ नोव्हेंबर रोजी २ वर्षे पूर्ण होत असून, आजवर नोटाबंदीचा फटका जाणवू लागला आहे.
औरंगाबाद : दिवाळीच्या तोंडावर तरी बँकांमध्ये ‘रोख’ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे होते; मात्र बाजारात नोटांचा तुटवडा असण्यास ८ नोव्हेंबर रोजी २ वर्षे पूर्ण होत असून, आजवर नोटाबंदीचा फटका जाणवू लागला आहे. ८ नोव्हेंबर २०१६ प्रमाणेच नागरिकांना यंदाच्या दिवाळसणात पैशांसाठी वणवण करण्याची वेळ आली.
ई-व्यवहाराचा बोलबाला करीत शासनाने नागरिकांना स्वाईप मशीनच्या दिशेने नेल्यामुळे दोन वर्षांपासून सर्वांचीच आॅनलाईन खरेदीवर झुंबड पडते आहे. दिवाळसणात स्वाईप मशीन हँग झाल्याने बँकांचे सर्व्हर ओव्हरलोड होऊन बंद पडले. पेटीएम, बँकांच्या अॅप्सवरही याचा परिणाम झाला. रोख रकमेच्या शोधार्थ नागरिकांची पावले बँकेच्या काऊंटरकडे वळली.
बँकांचे सर्व्हर हॅक झाल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. बँकांकडून मात्र याबाबत काहीही खुलासा, अथवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नव्हते. या सगळ्याचा परिणाम म्हणून सरकारी यंत्रणेतील रक्कम हस्तांतरित (ट्रान्झॅक्शन) करण्याच्या व्यवहारांना ब्रेक लागला. दिवाळीमुळे रक्कम संबंधितांना देण्यासाठी सर्व्हरवरून आरटीजीएस अथवा ई-ट्रान्झॅक्शन करण्याची कामे खोळंबली. वेगवेगळ्या शासकीय व्हॉटस्अॅप गु्रपमध्ये सर्व्हर हॅक झाल्याचे एसएमएस फिरत होते. संगणकावर आॅनलाईन व्यवहार सुरू असताना वेबसाईटवरून येणारे एसएमएस पुरावे म्हणून लेखा विभागातून टाकण्यात येत होते. सार्वजनिक बांधकाम विभागातील यंत्रणेची मंगळवारी पूर्ण दिवसभरात गाळण उडाली होती.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी मुकुंद वसेकर म्हणाले, सर्व्हर हॅक वैगेरे झाले नसावे. हा ओव्हरलोडचा प्रकार आहे. दिवाळीमुळे स्वाईप मशीनच्या आधारे खरेदीचे प्रमाण अचानक वाढल्यामुळे सर्व्हरवर लोड येऊन ते डाऊन झाले असेल. उद्यापर्यंत सर्व्हर सुरळीत होईल, असा अंदाज आहे. प्रत्येक बँकांचे वेगवेगळे प्रोजेक्ट कन्सल्टंट आहेत. त्यामुळे नेमकी तांत्रिक अडचण कुठे आली, हे समजण्यास मार्ग नाही.
बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे मत असे
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, सिस्टिममध्ये व्हायरस किंवा बग नव्हता; मात्र ट्रान्झॅक्शन फेल्युर रिपोर्ट येत होते. दिवाळीमुळे मोठ्या प्रमाणात ई-व्यवहार होणार हे गृहीत धरून सर्व्हरची क्षमता वाढविली नसावी. त्यामुळे सर्व्हर ओव्हरलोड होऊन डाऊन झाले असेल.
नोटाबंदीची दोन वर्षे
८ नोव्हेंबर २०१६ रोजी ऐन दिवाळसणात केंद्र शासनाने देशभरातील जुने चलन बंद करून नवीन चलन बाजारात आणल्याची घोषणा केली होती. त्या घटनेला ८ नोव्हेंबर २०१८ रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत.