ऑनलाइन शॉपिंग कायद्याच्या कक्षेत; ग्राहक तक्रार निवारण आयोग देईल न्याय,असा करा संपर्क
By प्रशांत तेलवाडकर | Published: April 1, 2023 07:59 PM2023-04-01T19:59:32+5:302023-04-01T19:59:59+5:30
ग्राहक तक्रार निवारण आयोग ‘तुम्हाला न्याय’ देण्यासाठी भक्कमपणे उभा
छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन वस्तू खरेदी करताना डोळे झाकून खरेदी केली जाते. जेव्हा ग्राहकाला आपली फसवणूक झाली हे कळते तेव्हा कुठे तक्रार करावी या प्रश्नामुळे गोंधळ उडून जातो. आता ग्राहकांच्या पाठीशी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग ‘तुम्हाला न्याय’ देण्यासाठी भक्कमपणे उभा आहे. कारण, कायद्यानेच ग्राहकांना अधिकार मिळवून दिले आहे.
कायद्यानुसार ग्राहकांना ६ अधिकार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ अंतर्गत ग्राहकांना हक्कांची हमी देण्यात आली आहे. १) सुरक्षिततेचा अधिकार २) माहिती मिळण्याचा अधिकार ३) निवडण्याचा अधिकार ४) ऐकण्याचा अधिकार ५) निवारण मागण्याचा अधिकार ६) ग्राहक जागृतीचा अधिकार.
ऑनलाईन खरेदीत अनेक वेळा ग्राहकांची फसवणूक होते. ई-कॉमर्स कंपनी जाहिरातीमध्ये जशी वस्तू दिलेली असते, तशी वस्तू प्रत्यक्षात ग्राहकाला दिली जात नाही. एखाद्या वस्तूची मागणी केली असता त्यापेक्षा वेगळीच वस्तू दिली जाते. यामुळे आता ऑनलाइन खरेदीबाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल करून ग्राहकांना न्याय घेता येणार आहे.
ऑनलाइन खरेदीत काय काळजी घ्यावी?
१) वस्तू ज्या वेबसाइटवरून खरेदी केली त्या वेबसाइटच्या खालच्या बाजूस ‘व्हेरी साइन ट्रस्टेड’ असे प्रमाणपत्र आहे का हे तपासून पाहावे.
२) नामवंत कंपन्यांच्या वेबसाइट अधिकृत आहेत याची शहानिशा संबंधित कंपनीच्या कॉल सेंटरवरून करावी.
३) वस्तू खरेदी केल्यानंतर आर्थिक तपशील भरताना आपल्याच बँकेची अधिकृत वेबसाइट लिंक असेल तरच माहिती भरावी.
४) ऑनलाइन आलेले पार्सल उघडताना त्याचा व्हिडीओ तयार करावा. ई-बिल तपासून पाहावे व जपून ठेवावे
आयोगाचे कार्यालय कुठे?
ऑनलाइन खरेदीत ग्राहकांची फसवणूक झाली असेल त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये तक्रार करावी. हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात समोरील बाजूस आहे. तक्रार तुम्ही स्वत: दाखल करू शकता. यासाठी वकिलाची आवश्यकता नाही.
ई-कॉमर्स कंपनी विरोधात तक्रारी वाढल्या
ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात कुठे तक्रार करणार याची माहिती अनेक ग्राहकांना नसल्याने ते फसवणूक होऊनही शांत बसतात. मात्र, ग्राहक तक्रार निवारण मंच अशा ग्राहकांना न्याय मिळवून देऊ शकते. यापूर्वीही ई-कॉमर्स कंपनी विरोधात निकाल देऊन ग्राहकांचे पैसे वसूल करून देण्यात आले आहे.
- स्मिता कुलकर्णी माजी अध्यक्षा, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग