पासपोर्टसाठी पोलिसांची घरपोच आॅनलाइन पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:22 AM2017-11-07T00:22:42+5:302017-11-07T00:22:46+5:30
पासपोर्टसाठी अर्ज केला असेल आणि तुम्ही ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर चारित्र्य पडताळणीसाठी तुम्हाला पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. कारण पोलीसच टॅब्लेट घेऊन तुमच्या घरी दाखल होतील
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पासपोर्टसाठी अर्ज केला असेल आणि तुम्ही ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर चारित्र्य पडताळणीसाठी तुम्हाला पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. कारण पोलीसच टॅब्लेट घेऊन तुमच्या घरी दाखल होतील आणि तुमच्यासह कुटुंबाचे छायाचित्र आणि शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून चारित्र्य पडताळणीचा गुप्त अहवाल लगेच आॅनलाइन पाठवूनही देतील. परिणामी, पासपोर्ट मिळण्याचे स्वप्न अधिक जलद गतीने साकारही होईल.
याविषयी अधिक माहिती देताना औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पासपोर्टसाठी ग्रामीण भागातील नागरिक अर्ज करतात. तेव्हा त्यांना पासपोर्ट विभागाकडून पोलिसांच्या विशेष शाखेकडून संबंधित पोलीस ठाण्याकडे पासपोर्टची फाइल जाते. तेथील पोलीस कर्मचारी संबंधित अर्जदाराला बोलावून घेत आणि कार्यवाही पूर्ण करीत. यात बराच कालावधी जात असे. बºयाचदा पासपोर्टचा अर्ज ठाण्यात आला अथवा नाही, हे पाहण्यासाठी अर्जदारांना ठाण्याला चकरा माराव्या लागत.
आता नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी ‘पोलीस तुमच्या दारी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. पासपार्ट विभागाकडून संबंधितांची पडताळणीसाठी फाइल प्राप्त होताच पोलीस ठाण्याचे संबंधित कर्मचारी अर्जदाराच्या घरी टॅब्लेट घेऊन हजर होतील.
तेथेच ते अर्जदारांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करतील. टॅब्लेटद्वारचे ते त्या कुटुंबाचे छायाचित्र घेऊन ते आॅनलाइन पद्धतीने वरिष्ठांना सादर करतील. यामुळे पासपोर्ट मिळण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे. यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना टॅब्लेट देण्यात आल्याची माहिती विशेष शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांनी दिली.