७० हजार शेतकऱ्यांसाठी केवळ ११ कृषी सहायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:05 AM2021-07-30T04:05:31+5:302021-07-30T04:05:31+5:30
रऊफ शेख फुलंब्री : तालुक्यातील कृषी विभागाची परिस्थिती वाईट असून, ७० हजार शेतकरी संख्येसाठी केवळ ११ कृषी सहायक ...
रऊफ शेख
फुलंब्री : तालुक्यातील कृषी विभागाची परिस्थिती वाईट असून, ७० हजार शेतकरी संख्येसाठी केवळ ११ कृषी सहायक आहेत. अपुऱ्या संख्येमुळे या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असून, दमछाक होत आहे. परिणामी शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचण्यात विलंब होत आहे. गेल्या आठ वर्षांपासून एक कृषी मंडळ वाढविण्याची मागणी मात्र, अद्यापही गुलदस्त्यात आहे.
फुलंब्री तालुक्यात ९३ गावे आहेत. यात शेतकरी संख्या ७० हजार असून, जमिनीचे क्षेत्र ७३ हजार हेक्टर एवढे आहे. अशा ठिकाणी कृषी विभागामध्ये किमान दोन कृषी मंडळ असणे आवश्यक आहे. पण, येथे केवळ एक कृषी मंडळ असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे. एक कृषी मंडळ वाढवावे या शेतकऱ्यांशी निगडित या महत्त्वाच्या प्रश्नाकडे गेल्या आठ वर्षांपासून प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे आढळून येते. कृषी मंडळ वाढविण्याची मागणी कृषी विभागाकडून करण्यात आली होती. तसेच यासाठी कृषी सहायकांनी १५ जून २०१९ मध्ये संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळी प्रशासनाने त्यांची केवळ आश्वासनावर बोळवण केली. तेव्हापासून अद्यापही मागणी पूर्ण झालेली नाही. यामुळे यंदाच्या खरीप हंगामात कपाशी पिकावर पडलेली शेंदरी रंगाची बोंड आळी, तसेच मक्यावर पडलेली अमेरिकन लष्करी अळीने शेतकरी त्रस्त असून, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालेले नाही. शेजारील खुलताबाद तालुक्यात दोन कृषी मंडळ व २४ कृषी सहायक आहेत. सोयगाव या छोट्या तालुक्यात ८३ गावांकरिता दोन कृषिमंडळ व २४ कृषी सहायक आहेत. यात फुलंब्री तालुक्यावरच अन्याय झालेला असून, ९३ गावांकरिता केवळ ११ कृषी सहायक आहेत.
चौकट -
योजनांसाठी मिळत नाही मार्गदर्शन
कृषी विभागाच्या वतीने शेततळे, जलयुक्त शिवार योजनेत पाणी अडवा पाणी जिरवाची कामे, फळबाग लागवडीसाठी मदत व मार्गदर्शन, नॅशनल होर्टिकल्चर, विहीर पुनर्भरण, योजनाची ऑनलाईन नोंदणी करणे, शिवाय शेतकऱ्यांना पीक पेराची माहिती देणे, प्रत्येक पिकांविषयी शेतकऱ्यांना माहिती देणे, खरीप व रब्बी पिकाच्या रोगराईबाबत वेळेवर मार्गदर्शन करणे ही कामे कृषी सहायक करतात. मात्र, संख्या कमी असल्याने फुलंब्री तालुक्यात यात अडचणी येत आहेत.
इतर तालुक्यांच्या तुलनेत फुलंब्रीवर अन्याय
औरंगाबाद जिल्ह्यातील तालुकानिहाय कृषी मंडळ व गावाची संख्या
तालुका गावे कृषी मंडळे
सिल्लोड १३१ ४
कन्नड २०१ ४
वैजापूर १६५ ४
गंगापूर २२५ ४
पैठण १८८ ४
औरंगाबाद १९२ ३
खुलताबाद ७६ २
सोयगाव ८३ २
फुलंब्री ९३ १