छत्रपती संभाजीनगरात फक्त १२ रसवंत्यांना परवानगी? १०० पेक्षा अधिक रसवंत्या अनधिकृतपणे सुरू
By मुजीब देवणीकर | Published: April 29, 2023 07:23 PM2023-04-29T19:23:27+5:302023-04-29T19:24:20+5:30
शहरात पूर्वी रसवंती चालकांकडून ठराविक रक्कम मालमत्ता विभागाकडून वसूल करण्यात येत होती.
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरू होताच शहरात रसवंत्यांच्या घुंगरूचे मंजूळ स्वर कानी पडून लागले. उन्हाळा संपायला आता एक महिनाच शिल्लक आहे. धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण शहरात फक्त १२ रसवंती चालकांनी मनपाकडून परवानगी घेतली आहे. खासगी जागेत रसवंती चालविण्यासाठी मनपाचा बाजार परवाना विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. १०० पेक्षा अधिक रसवंत्या अनधिकृतपणे सुरू आहेत.
शहरात पूर्वी रसवंती चालकांकडून ठराविक रक्कम मालमत्ता विभागाकडून वसूल करण्यात येत होती. अलीकडेच प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी रेडिरेकनर दरानुसार रसवंती चालकांकडून किमान ११ हजार रुपये महिना वसूल करावा, असा निर्णय घेतला. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी मनपाच्या बाजार परवाना विभागाकडे १०० पेक्षा अधिक अर्ज परवानगीसाठी आले. कर्मचाऱ्यांनी रसवंती चालकांना रेडिरेकनर दराची माहिती दिली. हे दर पाहून चालकांनी धूम ठोकली. आता फोन केले तरी रसवंती चालक, मालक मनपात यायला तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरात १०० पेक्षा अधिक रसवंत्या राजरोसपणे सुरू आहेत. त्यातील काही खासगी जागेवर आहेत. खासगी जागेवरही रसवंती सुरू करण्यासाठी मनपाकडे दोन हजार रुपये भरावे लागतात.
१० जणांना नोटिसा
मनपाने अतापर्यंत फक्त १० अनधिकृत रसवंती चालकांना नोटिसा दिल्या. त्यांनी स्वत:हून रसवंती काढून न घेतल्यास अतिक्रमण हटाव विभागाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.
सिडको-हडकोत परवानगी नाही
खंडपीठाच्या आदेशामुळे सिडको-हडकोत सार्वजनिक ठिकाणी, खुल्या जागेवर, रस्त्याच्या कडेला, ग्रीनबेल्टमध्ये मनपाकडून परवानगी देण्यात येत असत. यंदा एकही परवानगी दिली जाणार नाही. खासगी जागेवर असेल तरच परवानगी मिळेल.
चिपाटे जाळण्याचे प्रकार
आमखास मैदानाजवळील कमल तलाव परिसरात रात्री रसवंती चालक उसाचे चिपाटे आणून टाकतात. त्यावर पेट्रोल, डिझेल टाकून ते पेटवून देतात. त्यामुळे या भागात प्रचंड धूर होतो. परिसरातील हजारो नागरिकांना दोन महिन्यांपासून या धुराचा त्रास सहन करावा लागतोय. वास्तविक पाहता रसवंती चालकांनी शास्त्रोक्त पद्धतीने चिपाट्यांची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.