मराठवाड्याच्या रेल्वेसाठी अवघा १.४५ टक्के निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:02 AM2021-02-06T04:02:06+5:302021-02-06T04:02:06+5:30
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेला अर्थसंकल्पातून प्राप्त झालेल्या निधीपैकी मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी केवळ १.४५ टक्के निधी खर्च होणार आहे. ...
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेला अर्थसंकल्पातून प्राप्त झालेल्या निधीपैकी मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी केवळ १.४५ टक्के निधी खर्च होणार आहे. उर्वरित निधी आंध्रप्रदेश आणि तेलंगणात दुहेरीकरण, तिहेरीकरण, विद्युतीकरणासह नव्या रेल्वे मार्गांसाठी खर्च होणार असल्याने रेल्वे संघटनांतून संताप व्यक्त होत आहे.
अर्थसंकल्पात मराठवाड्यात अनेक वर्षांपासून प्रतीक्षा केल्या जाणाऱ्या मनमाड - परभणी मार्गाचे दुहेरीकरण, औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव मार्ग, रोटेगाव - कोपरगाव मार्ग, जालना - खामगाव मार्ग, पूर्णा येथे लोको शेड, पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड येथे बायपास लाईन, औरंगाबादेत पीटलाईन या मागण्यांचा विचारच करण्यात आला नाही. दक्षिण मध्य रेल्वेला मिळालेल्या एकूण निधीपैकी फक्त १.४५ टक्के निधी मराठवाड्यात यावर्षी खर्च होणार असल्याचे मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी सांगितले. संपूर्ण झोनमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या औरंगाबादच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.
मनमाड - मुदखेड - ढोणे मार्ग विद्युतीकरणासाठी १७५ कोटी
मनमाड - मुदखेड - ढोणे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी १७५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ७८३ किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणासाठी २०१५-१६मध्येच मंजुरी मिळाली आहे. ८६५ कोटी रुपयांच्या निधीतून या मार्गाचे विद्युतीकरण होणार आहे. पूर्णा - आकोला मार्गाच्या विद्युतीकरणासाठी ८५ कोटी मंजूर झाले आहेत.
सर्वेक्षणातच रेल्वे मार्ग
औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव मार्गाचा प्रस्ताव रेल्वे बाेर्डाने गुंडाळला आहे. मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी विचारलेल्या माहिती अधिकारातूनही ही बाब समोर आली. रोटेगाव - कोपरगाव हा प्रस्तावित मार्गही अद्याप सर्वेक्षणात आहे. जालना - खामगाव मार्गाच्या सर्वेक्षणासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. सोलापूर - तुळजापूर - जालना हा मार्गही गुंडाळण्यात आला आहे, अशी माहिती ओमप्रकाश वर्मा यांनी दिली.