शहरातील १७ लाख नागरिकांसाठी हिवताप कर्मचारी १६५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 05:13 PM2019-10-09T17:13:13+5:302019-10-09T17:14:23+5:30
मागील अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरण्यातच आलेली नाहीत.
औरंगाबाद : डेंग्यूने शहरात सात जणांचा बळी घेतला. डेंग्यूचा थैमान नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तोकडी पडत आहे. शहरातील तब्बल १७ लाख नागरिकांसाठी हिवताप विभागात केवळ १६५ कर्मचारी कार्यरत आहेत. मागील अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरण्यातच आलेली नाहीत. विविध साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी हिवताप विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात साथरोगांनी डोके वर काढले. आता डेंग्यूने थैमान घातले आहे. महिनाभरात तब्बल सात जणांचा डेंग्यूने मृत्यू झाला. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत धूरफवारणी, औषधफवारणी, अॅबेट वाटप, नागरिकांमध्ये जनजागृती, आरोग्य तपासणी, कोरडा दिवस पाळणे आदी कामे करण्यात येतात. महापालिकेने अतिजोखमीच्या भागात विशेष मोहिमा सुरू केल्या आहेत. डेंग्यूवर पाहिजे तसे नियंत्रण अद्याप मिळालेले नाही. खाजगी रुग्णालये आजही हाऊसफुल आहेत. शहराची लोकसंख्या विचारात घेता मनपाच्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. महापालिकेच्या हिवताप विभागात केवळ १६५ कर्मचारी कार्यरत आहेत. १७ लाख लोकसंख्येसाठी ही कर्मचारी संख्या अपुरी आहे.
तीन दशकांत ९७ पदे वाढली
१९७८ मध्ये शासनाने शंभर टक्के अनुदानावर नागरी हिवताप योजना लागू केली. त्यात ६८ पदे मंजूर करण्यात आली. सध्या या विभागात १६५ कर्मचारी कार्यरत आहेत. मागील ३१ वर्षांत केवळ ९७ पदे वाढली आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य सांभाळताना आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे.
आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त
महापालिकेच्या आरोग्य विभागात सध्या जीवशास्त्रज्ञ, मलेरिया सुपरवायझर, कीटक संमाहरक या पदांवर एकही अधिकारी कार्यरत नाही. त्यामुळे या पदांसाठी पाठपुरावा सुरू आहे.
नवीन आकृतिबंधात पदांची अपेक्षा
जीवशास्त्रज्ञ ०१
आरोग्य सहायक १०
कीटक संमाहरक ०४
श्रेत्र कर्मचारी २०४
वाहनचालक ०४
मलेरिया पर्यवेक्षक ०३
वरिष्ठ क्षेत्र कर्मचारी ६८